‘लोकमान्य’च्या व्याख्यानात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे मत : चीनसारख्या शत्रूशी सावधपणे लढण्याचा दिला सल्ला
प्रतिनिधी / पुणे
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धसंघर्षात चीनने पाकला छुपी मदत केली असून, जवळपास 20 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्रे पाकला पुरवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चीनही पाकइतकाच आपला मोठा शत्रू आहे. आपल्या जवानांचे रक्त सांडण्यास चीन तितकाच जबाबदार असून, भविष्यात ड्रॅगनलाही धडा शिकवायला हवा, असे स्पष्ट मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी येथे व्यक्त केले.
‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी’च्यावतीने ‘ऑपरेशन सिंदुर’अंतर्गत भारताने पाकिस्तानला कसा धडा शिकवला’ या विषयावर महाजन यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘लोकमान्य’चे संस्थापक-अध्यक्ष व तऊण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर होते.
महाजन म्हणाले, भारत व पाक यांच्यातील युद्धसंघर्षात चीनने पाकला मोठी मदत केली. 20 अब्ज डॉलर्सचा शस्त्रसाठा दिला, तंत्रज्ञान पुरविले. पाकिस्तानसाठी पाच सॅटेलाईट लाँच केले. याशिवाय विमानांच्या टॅकिंगसाठीही पाकला त्यांची मदत झाल्याचे दिसते. त्यामुळे भारतीय जवानांचे रक्त सांडण्याकरिता चीनही कारणीभूत आहे, असे म्हणता येईल. आता चीनला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. सर्वप्रथम आपण चीनवर आर्थिक बहिष्कार घालायला हवा. आपले व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर चायनीज मालावर अवलंबून आहेत. त्याकरिता चायनीज मालास प्रतिबंध करायला हवा. चिनी उत्पादनांऐवजी भारतीय अथवा अन्य कंपन्यांचा माल घेतला पाहिजे.
चीनची आर्थिक क्षमता प्रचंड आहे. अनेक संस्था चायनाने विकत घेतल्या आहेत. 2020 पासून जगभर पसरलेल्या कोरोना साथीला चीनमधूनच सुऊवात झाली. असे असूनही डब्ल्यूएचओने याचा चीनला जाब विचारला नाही. चीनकडून जागतिक आरोग्य संघटनेला 40 टक्के निधी मिळतो. त्यामुळेच चीनबद्दल अशा जागतिक संस्था अवाक्षर काढताना दिसत नाहीत. म्हणूनच चीनसारख्या शत्रूशी सावधपणे लढावे लागेल, असा सल्ला महाजन यांनी दिला.
पाकिस्तानबाबत बोलताना महाजन म्हणाले, भारताविऊद्धच्या तिन्ही युद्धात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. याची जाणीव झाल्यानेच ते छुप्या युद्धाचा फॉर्म्युला वापरतात. मागच्या काही दिवसांमध्ये काश्मीरचा मुद्दा बाजूला पडल्यासारखा झाला होता. त्यात रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धसंघर्षात तर हा मुद्दा बाजूलाच पडला. त्यामुळे जगाचे लक्ष वेधण्यासाठी पहलगामवर अॅटॅक करण्यात आला. खरे तर मागच्या काही दिवसांपासून या भागात शांतता होती. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्यात जमा होते. रस्ते, बोगदे व अन्य सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्याने पर्यटकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली होती. त्यात अमेरिकेचे उपाध्यक्षही भारत भेटीवर होते. ही वेळ पाकने साधली. मात्र, भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले. पाकचे हल्ले परतावून लावतानाच त्यांच्यावर कठोर प्रहार करण्यात आले. पाकमधील न्युक्लिअर प्लॅन्टला आपल्या मिसाईलने डॅमेज केल्यानंतर तेथे किरणोत्सर्ग सुरू झाला व त्यातूनच पुढे युद्धविराम झाला, असेही म्हटले जाते. परंतु, या सर्वांत भारताने रणनीतीचाही कौशल्याने वापर केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ट्रम्पपुत्राच्या करन्सीत गुंतवणूक नि आयएमएफची मदत?
अमेरिकेतील ज्या क्रिप्टोकरन्सीत पाकने गुंतवणूक केली, त्यामध्ये ट्रम्प यांचा मुलगा असल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकला मिळालेल्या मदतीमागे हे कनेक्शन आहे का, असा प्रश्न निर्माण होत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली.
पाकच्या सैन्यदलाचे मनोबल तुटलेय
सध्या पाकिस्तानच्या सैन्याचे मनोबल पूर्णपणे तुटले आहे. बलुचिस्तानमधील बंडखोरांच्या बंडाला त्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. खैबर पख्तुनख्वामधील वातावरणही पाकविरोधी असून, अफगाणिस्तानसोबत पाकचा संघर्ष सुरू आहे. अंतर्गत वाद व देशाची कोसळलेली अर्थव्यवस्था यामुळे सध्या पाक जेरीस आला आहे. पाकमधील ही परिस्थिती भारतासाठी संधी असल्याचे मत त्यांनी नोंदविले.
युरोपातून भारताला मदतीची संधी
या युद्धात भारताला इस्रायलसारख्या देशाची चांगली मदत झाली. फ्रान्सनेही आपल्याला राफेलसाठी मदत केली आहे. अन्य युरोपियन राष्ट्रांकडूनही आपल्याला आगामी काळात मदत मिळू शकते, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
..तर चार दिवसपर्यंतच पाक लढू शकला असता
वॉटर वॉर हा यामधला महत्त्वाचा मुद्दा ठरतो. भारताने पाकिस्तानला जाणारे पाणी रोखल्याने सिंधू खोऱ्यात पाकची कोंडी झाली. पाकवर आर्थिक निर्बंध लादण्यात आल्याने व्यापार ठप्प झाला. अटारीतून पाच ते सहा हजार कोटी ऊपयांचा व्यापार होतो. तो थांबविण्यात आल्याने पाकला जादा दराने अन्य देशांतून माल घेणे भाग पडले. त्यामुळे तेथील महागाईत आणखी तेल ओतले गेले. मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करावे लागल्याने तोही भार या कर्जबाजारी देशावर पडला. भारताने युद्धसंघर्ष सुरू केल्यानंतर पुढचे केवळ चार दिवस लढाई करता येईल, एवढीच पाकची तयारी होती, असेही त्यांनी सांगितले.
पुणे, बेळगाव ही जागरुक शहरे : डॉ. किरण ठाकुर
डॉ. किरण ठाकुर म्हणाले, राष्ट्रप्रेम तऊण पिढीत जागृत व्हावे म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. बांगलादेश निर्मितीनंतर पाकिस्तानने कोल्ड वॉर सुरू केले. भारतावर जखमा करणे सुरू ठेवले. बेळगावमध्ये मराठा इन्फंट्री आहे. पुण्यातसुद्धा सैन्यदलाशी निगडित अनेक संस्था आहेत. ही शहरे राजकीय, सैन्याच्या तसेच राष्ट्रप्रेमाच्या दृष्टीने जागरुक शहरे आहेत, असेही त्यांनी नमूद केले.









