वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची लोकसंख्या 1 जुलै रोजी 139 कोटी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्र्यांनी लोकसभेत मंगळवारी दिली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभाग, लोकसंख्या विभागाचे ऑनलाइन पब्लिकेशन अणि वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्ट्स 2022 नुसार चीनची लोकसंख्या 1 जुलै रोजी 142 कोटी 56 लाख 71 हजार अनुमानित करण्या आली होती असे केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेला सांगितले आहे.
राय यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल ही माहिती दिली आहे. लोकसंख्या विषयक राष्ट्रीय आयोगाने स्वत:च्या अहवालात 1 जुलै 2023 रोजी देशाची लोकसंख्या 1 अब्ज 39 कोटी 23 लाख 29 हजार असल्याचा अनुमान व्यक्त केला होता. केंद्र सरकारने 2021 मध्ये जनगणना करविण्यासाठी 28 मार्च 2019 रोजी गॅझेटमध्ये अधिसूचना दिली होती. परंतु 2019 मध्ये कोरोना महामारीचे संकट उभे ठाकल्याने जनगणनेविषयीचे कार्य रोखण्यात आले होते असे राय यांनी सांगितले आहे.
काही काळापूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेने भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश ठरल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जारी केलेली आकडेवारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. केंद्र सरकारनुसार भारत अद्याप दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश आहे. यासंबंधीची स्पष्टता जनगणना पूर्ण झाल्यावरच येण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये होणारी जनगणना कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडली आहे. जनगणनेचे कार्य कदाचित पुढील वर्षी लोकसभा निवडणूक झाल्यावर सुरू होणार असल्याची चर्चा आहे.









