अमेरिकेकडून मोठा झटका : स्वत: स्वस्त कर्ज घेऊन गरीब देशांना ड्रॅगनने लुटले
► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या संसदेने चीनला आर्थिक आघाडीवर मोठा झटका दिला आहे. अमेरिकन सिनेटने एका नव्या कायद्याला मंजुरी दिली आहे. यानुसार चीनला आता अमेरिका कुठल्याही स्थितीत विकसनशील देशाचा दर्जा देणार नाही. अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडणार आहे. जागतिक बँक तसेच अन्य वित्तीय संस्थांकडून चीनला आता सहजपणे आणि कमी व्याजदरात कर्ज मिळणार नाही. चीन विकसनशील देशाच्या दर्जामुळे स्वत: स्वस्त दरात कर्ज मिळवत होता, परंतु गरीब देशांना जाचक अटींवर अधिक व्याजदरावर कर्ज देऊन एकप्रकारे त्यांची लूट करत होता.
अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहात मार्च महिन्यात चीनविरोधात विधेयक सादर करण्यात आले होते. या विधेयकाच्या (चायना इज नॉट ए डेव्हलपिंग कंट्री अॅक्ट) समर्थनार्थ सभागृहातील सर्व 415 खासदारांनी मतदान केले आहे. एकाही खासदाराने या विधेयकाला विरोध केलेला नाही. 9/11 हल्ल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या संसदेत अशाप्रकारचे समर्थन एखाद्या विधेयकाला मिळाले आहे. आता सिनेटने देखील कुठल्याही फेरबदलाशिवाय या विधेयकावर स्वत:ची मोहोर उमटविली आहे.
विधेयकाचा प्रभाव
अमेरिकेच्या सिनेटमध्ये विदेश संबंध समिती असते, या समितीच्या पुढाकारावरच चीनचा विकसनशील देशाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. यामुळे भविष्यात अमेरिकेचे सरकार किंवा त्याकडून निधी प्राप्त करणारी कुठलीही आंतरराष्ट्रीय संघटना चीनला आर्थिक किंवा तांत्रिक आघाडीवर सवलती देणार नाही. चीनला आता विकसनशील देशाप्रमाणे सवलती दिल्या जाऊ शकत नसल्याचे संसदेने म्हटले आहे.









