पेंटागॉनच्या अहवालात दावा : लडाख-डोकलामजवळ रस्ते-हेलिपॅडची निर्मिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीनने अद्याप एलएसीवरील लष्करी तैनातीमध्ये कोणतीही कपात केली नसल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने आपल्या अहवालात दिली आहे. तसेच चीन सीमेवर सतत रस्ते, गावे, साठवण सुविधा, एअरफील्ड आणि हेलिपॅड बनवत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. 3,488 किमी लांबीच्या ‘एलएसी’वर चिनी वेस्टर्न थिएटर कमांडची तैनाती 2023 पर्यंत सुरू राहील. गेल्यावषी, चीनने ‘एलएसी’च्या पश्चिम सेक्टरच्या लडाख बाजूला राखीव भागात चार संयुक्त-शस्त्र ब्रिगेडसह झिनजियांग आणि तिबेट लष्करी जिह्यांतील दोन विभागात सीमा रेजिमेंट तैनात केली होती.
चीनने गेल्या वर्षभरात अण्वस्त्रांची संख्याही वाढवली आहे. त्यांच्याकडे आता 500 अण्वस्त्रे असल्याचे पेंटागॉनने आपल्या अहवालात म्हटले आहे. यापूर्वी, गेल्या काही वर्षांत चीनने आपल्या अण्वस्त्रांच्या शस्त्रागारात 60 नवीन शस्त्रे जोडली असल्याचे स्वीडिश थिंक टँक ‘सिप्री’ने आपल्या अहवालात म्हटले होते. पेंटागॉननुसार, 2030 पर्यंत एक हजार अण्वस्त्रे बनवण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे.
चीनने सिक्कीम आणि अऊणाचल प्रदेशच्या सीमेजवळ 3 तुकड्यादेखील तैनात केल्या आहेत. याशिवाय उत्तराखंड आणि हिमाचलजवळील सीमेवरही अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. चीनने डोकलामजवळ भूमिगत साठवण सुविधाही बांधल्या आहेत. याशिवाय एलएसीच्या तिन्ही सेक्टरमध्ये नवीन रस्तेही बांधण्यात आले आहेत. पँगोंग तलावावर दुसरा पूलही बांधण्यात आला आहे. चीनने भूतानसह वादग्रस्त भागातही गावे वसवली आहेत, असे पेंटागॉनने म्हटले आहे.









