डोकलामच्या अत्यंत नजीक पोहोचला चीन : भारताची वाढली चिंता : चिकन नेक कॉरिडॉरला धोका
वृत्तसंस्था/ थिम्पू
चीनने भूतानच्या भूमीवर 22 हून अधिक गावं वसविली आहेत. भारताच्या सीमेच्या आसपास ही निर्मिती मागील 8 वर्षांमध्ये झाली आहे. यात 2020 पासूनच डोकलामनजीक 8 गावं चीनने वसविली आहेत. उपग्रहीय छायाचित्रांद्वारे चीनच्या या निर्मितीची माहिती समोर आली आहे. चीनच्या या कृत्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. कारण डोकलाम भारतासाठी रणनीतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चीनने या निर्मितीद्वारे भारताच्या चिकन नेक कॉरिडॉर संबोधिल्या जाणाऱ्या सिलिगुडी कॉरिडॉरची सुरक्षा धोक्यात आणली आहे. तर चीनच्या या कृत्यांमुळे भारत आणि भूतानच्या संबंधांवरही प्रभाव पडणार आहे.
चीनने भूतानच्या भूमीवर गावं वसवून स्वत:ची स्थिती मजबूत केली असल्याने भारतासाठी हा गंभीर चिंतेचा विषय आहे. विशेषकरून सिलिगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेसाठी भारताची चिंता वाढणार आहे. हा कॉरिडॉर भारताला ईशान्येच्या राज्यांशी जोडणारा चिंचोळा मार्ग आहे.
स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजचे (एसओएएस) संशोधन सहाय्यक रॉबर्ट बार्नेट यांच्या अहवालानुसार 2016 पासून चीनने भूतानच्या भूमीवर 22 गावं आणि वसाहती निर्माण केल्या आहेत. यात सुमारे 2,284 घरं असून तेथे 7 हजार लोकांचे वास्तव्य आहे. चीनने 825 चौरस किलोमीटर भूभागावर कब्जा केला असून हे प्रमाण भूतानच्या एकूण क्षेत्रफळाच्या 2 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. चीनने या गावांमध्sय अधिकारी, सीमा पोलीस आणि सैनिकांना तैनात केले आहे. सर्व गावं चिनी शहरांशी रस्त्यांनी जोडण्यात आली आहेत.
भूतानच्या पश्चिम क्षेत्रात स्वत:च उपस्थिती वाढवून डोकलाम पठार आणि आसपासच्या भागांवर कब्जा मजबूत करणे हा चीनचा उद्देश आहे. पश्चिम क्षेत्रातील 8 गावं उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत 36 किलोमीटर लांब रांगेत निर्माण करण्यात आली आहेत. प्रत्येक गावात सरासरी 5.3 किलोमीटरचे अंतर आहे. ही गावं अशा क्षेत्रात निर्माण करण्यात आली आहेत, जे 1913 मध्ये तिबेटच्या तत्कालीन शासकाने भूतानला सोपविले होते. भारतासाठी डोकलामचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे उद्गार बार्नेट यांनी काढले आहेत.
डोकलामवरून वाद
डोकलाममध्ये भारत आणि चीनदरम्यान वाद नवा नाही. 2017 मध्ये भारत आणि चीनचे सैनिक 73 दिवसांपर्यंत या क्षेत्रात आमने-सामने उभे ठाकले होते. त्यावेळी चीनकडून तेथे होणाऱ्या रस्तेनिर्मितीला भारताने विरोध दर्शविला होता. दीर्घकाळापर्यंत तणावानंतर दोन्ही देशांचे मागे हटले होते. चीन काही दिवस या क्षेत्रात शांत राहिला आणि मग डोकलामनजीक त्याने निर्मितीच्या हालचालींना वेग दिला होता. तेथील बांधकाम आता उपग्रहीय छायाचित्रांद्वारे समोर आले आहे.
लडाखमधील तणावाची पार्श्वभूमी
2020 साली पूर्व लडाख क्षेत्रातील गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. या झटापटीत 20 भारतीय सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. तर चीनचे 40 हून अधिक सैनिक मारले गेल्याचे समोर आले. या घटनेनंतर दोन्ही देशांचे संबंध अत्यंत तणावपूर्ण झाले होते. अलिकडेच दोन्ही देशांदरम्यान हा तणाव दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांना वेग मिळाला आहे. यानुसार दोन्ही देशांचे सैन्य काही ठिकाणांवरून मागे हटले आहे.









