वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनने भारताच्या दोन पत्रकारांना स्वतःच्या देशात प्रवेश करण्यापासून रोखले आहे. काही आठवडय़ांपूर्वी भारताने चीनच्या एका पत्रकाराला देश सोडण्याचा निर्देश दिला होता. या पार्श्वभूमीवर चीनकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. बीजिंगमध्ये प्रसारभारतीचे प्रतिनिधी अंशुमन मिश्रा आणि एका इंग्रजी वृत्तपत्राचे प्रतिनिधी अनंत कृष्णन यांना चिनी अधिकाऱयांकडून व्हिसा गोठविण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. मिश्रा आणि कृष्णन हे अलिकडेच वैयिक्तक कारणास्तव भारतात परतले होते.
या प्रकरणी भारत सरकारने अद्याप कुठलीच टिप्पणी केलेली नाही. भारताच्या या दोन्ही पत्रकारांना चीनमध्ये परतता येणार नसल्याचे कळविण्यात आले आहे. हे दोन्ही पत्रकार लवकरच कामानिमित्त चीनमध्ये परतणार होते. परंतु त्यापूर्वीच चीनने प्रत्युत्तरादाखल ही कारवाई केली असल्याचे मानले जात आहे. कथित स्वरुपात याप्रकरणी आता बीजिंगमधील भारतीय दूतावास आणि चिनी एमएफए यांच्यात चर्चा सुरू आहे.
भारत सरकारने मागील महिन्यात चीनची शासकीय वृत्तसंस्था शिन्हुआच्या नवी दिल्लीतील एका प्रतिनिधीला भारतीय व्हिसाचे नुतनीकरण करण्यात येणार नसल्याचे कळविले होते. शिन्हुआच्या प्रतिनिधीला 31 मार्चपर्यंत चीनमध्ये परतण्यास सांगण्यात आले होते.
बीजिंगमध्ये अद्याप कार्यरत असलेले दोन भारतीय पत्रकार तेथेच थांबू शकतात. या पत्रकारांमध्ये प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे के.जे.एम. वर्मा आणि एका इंग्रजी वृत्तपत्राचे प्रतिनिधी सुतिर्थो पॅट्रानोबिस यांचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी बीजिंगमध्ये 6 भारतीय पत्रकार कार्यरत होते, परंतु काही काळानंतर ही संख्या कमी होत 4 वर आली. मागील काही वर्षांमध्ये निवडक भारतीय पत्रकारांनाच चीन सरकारकडून फेलोशिप देण्यात आली आहे, यामुळे त्यांना चीनमध्ये राहून स्वतःच्या प्रसारमाध्यम संस्थेसाठी वृत्तांकन करण्याची अनुमती मिळाली आहे.
चीनची शासकीय वृत्तसंस्था शिन्हुआचा ‘देशविरोधी’ कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप सुरक्षा यंत्रणांनी केला होता. याचमुळे भारत सरकारने चिनी पत्रकाराला देश सोडून जाण्यास सांगितले होते.









