गावात चर्चांना ऊत, श्वान पथकाला लागेना सुगावा
वार्ताहर/ शिवथर
शिवथर (ता. सातारा) येथे भरवस्तीत एका घराच्या दरवाजाजवळ साधारण नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे शिवथर गावासह तालुक्यात खळबळ माजली आहे. सदरची घटना गावामध्ये वाऱयासारखी पसरली. त्यामुळे घटनास्थळी मोठय़ा प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या घटनेची माहिती सातारा तालुका पोलीस स्टेशनला समजल्यावर पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. यामुळे गावात विविध चर्चांना ऊत आला असून हे अर्भक नक्की कोणी टाकले याबाबत पोलीस तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, शिवथर येथे श्रीनिवास संपत साबळे हे सकाळी सहा वाजता झोपेतून उठल्यावर दरवाजा उघडण्यासाठी आले असता दरवाजा बाहेरून बंद अवस्थेमध्ये आढळून आला. त्यांनी खिडकीतून पाहिले असता त्यांना काहीतरी गहाण कोणीतरी आणून टाकल्यासारखे वाटले. त्यांनी घराच्या पाठीमागून घरासमोर आल्यावर मृत अर्भक दिसून आले. साबळे यांनी तातडीने पोलीस पाटील यांना खबर दिली. घटनास्थळावर सातारा तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी व त्यांचे सहकारी घटनास्थळी आले असता व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अंदाजे नऊ महिन्याच्या मुलाचा मृतदेह दिसून आले.
घटना अतिशय गंभीर असल्याने पोलिसांनी श्वानपथक मागवले व घटना घडली त्या ठिकाणी काही पुरावे सापडतात का याची तपासणी केली. हा मृतदेह कोणी आणि का साबळे यांच्या घराजवळ टाकले त्याचा तपास केला असता सध्या तरी काही आढळून आले नाही. सदरची घटना अतिशय निंदनीय असल्याने पोलिस यंत्रणेला आव्हान ठरणार आहे
तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी, पीएसआय ज्ञानेश्वर दळवी, बीट अंमलदार प्रफुल्ल डोंबाळे, हेड कॉन्स्टेबल आर. व्ही. घोरपडे अधिक तपास करत आहेत.








