सरपंच, पर्यटनमंत्री, मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी देण्याचे साकडे
तिसवाडी : चिंबल गावातील ग्रामस्थांनी काल रविवारी तळ्यार या तळीच्या राखणदार बायंगिणेश्वर घुमटीजवळ एकत्र येऊन चिंबल कदंब पठारावर होऊ घातलेल्या युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ प्रकल्पांना तीव्र विरोध दर्शवून राखणदाराला गाऱ्हाणे घातले. यावेळी ‘गाकुवेध’चे अध्यक्ष गोविंद शिरोडकर, आरजीपी अजय खोलकर आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. गोविंद शिरोडकर यांनी गाऱ्हाणे घालताना सांगितले की, गेल्या सात वर्षांपासून पर्यटनमंत्री रोहन खंवटे या जमिनीच्या मागे लागले आहेत. त्यांना सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि चिंबलचे सरपंच संदेश शिरोडकर यांनाही सद्बुद्धी मिळावी, असे ते म्हणाले. या प्रकल्पांमुळे गावाच्या पर्यावरणाला आणि सांस्कृतिक वारशाला धोका निर्माण होईल, असा ग्रामस्थांचा दावा आहे, असेही ते म्हणाले.
बायंगिणेश्वर राखणदार हे जागरूक आणि पवित्र आहेत. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या प्रकल्पांचा शिलान्यास झाला होता, परंतु ग्रामस्थांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला. शनिवारी चिंबलच्या ग्रामस्थांनी पणजीतील आझाद मैदानावर निषेध मोर्चा काढला होता. या प्रकल्पांमुळे स्थानिकांचे जीवनमान आणि जमिनीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी भीती शिरोडकरसह सर्वांनी व्यक्त केली. गाऱ्हाणे घातल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ग्रामस्थांनी सरकारला या प्रकल्पांचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, विकासाच्या नावाखाली स्थानिकांचे हित दुर्लक्षित होऊ नये. युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ प्रकल्प रद्द करून गावाच्या हिताला प्राधान्य द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी लावून धरली आहे. सरकार यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









