वार्ताहर /दाभाळ
गणनाथ ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेतर्फे निरंकाल येथील गणनाथ हायस्कूल व सावरगाळ किर्लपाल येथील सोमनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी बालमेळावा आयोजित करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र उर्फ बाबय तुकाराम प्रभू यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी हा बाल मेळावा आयोजित केला जातो.
निरंकाल येथील गणनाथ हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन उद्योजक तथा समाजसेवक संदीप निगळय़े यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बाबय प्रभू यांचे सुपूत्र अभय प्रभू, संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम प्रभू, जादूगार हर्ष सामंत, हायस्कूलचे व्यवस्थापक विकास प्रभू, मुख्याध्यापिका बिन्नी बार्बोझा, सोमनाथ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रज्वला बखले, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रेमानंद शेटकर, विठ्ठल सामंत, निवृत्त शिक्षक गिरीश वेळगेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदीप निगळय़े म्हणाले, शिक्षणामुळे माणसाची प्रगती होत असते. मात्र विद्यार्थ्यांनी क्रमिक शिक्षणाबरोबरच भौतिक ज्ञानही आत्मसात केले पाहिजे. माजी आमदार स्व. बाबय प्रभू यांनी ग्रामीण भागात दोन शाळा उभारून मुलांना शिक्षणाची सोय करून दिलेली आहे. या दोन्ही शाळांनी आपला शैक्षणिक दर्जा राखल्याने बाबय प्रभू यांचे स्वप्न साकार झाले आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी न लेकता आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर उच्च भरारी घेण्याची तयारी ठेवावी. त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. अभय प्रभू यांनी वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी आपल्यामधील कला कौशल्ये व सुप्त गुणांचा योग्यवेळी विकास साधल्यास त्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे सांगितले.
गणनाथ व सोमनाथ हायस्कूलमधून दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेले सारंग दामोदर नाईक, जिया नामदेव नाईक व श्रेया शशिकांत गावकर या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱया माजी विद्यार्थ्यांचा तसेच निवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱयांचा सन्मान करण्यात आला. गणनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्याहस्ते रामचंद्र प्रभू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलीत करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रज्वला बखले यांनी बाबय प्रभू यांच्या कार्याचा आढावा घेतला. धीरज गावकर यांनी स्वागत तर शिक्षिका पियुषा नाईक, कविता वेळीप व सौरव नाईक यांनी सत्कारमूर्तींची नामावली सादर केली. अपेक्षा नाईक यांनी आभार मानले. उद्घाटन सोहळय़ानंतरच्या सत्रात जादूगर हर्ष सामंत यांनी जादूचे प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व मनोरंजनाचे कार्यक्रमही झाले.









