लेखन क्षेत्रात सदैव प्रयत्नशील असावे : प्रा. अदिती बर्वे
पणजी : कुजिरा-बांबोळी येथील हेडगेवार शाळेतील ’कल्पसृजन मंडळा’तर्फे भव्यदिव्य स्वरूपात दोन दिवसीय बालसाहित्य संमेलन घेण्यात आले. ”मुलांनी अपयशाने खचून न जाता लेखन क्षेत्रात सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे,” असे उद्गार साहित्यिक तथा श्रीनिवास सिनाय धेम्पो वाणिज्य महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. अदिती बर्वे यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटक या नात्याने बोलताना काढले. संमेलनात त्यांनी ’लेखन व वाचन’ या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी शाळेचे व्यवस्थापक सुभाष देसाई, शाळेचे मुख्याध्यापक विलास सतरकर, साहाय्यक मुख्याध्यापिका स्मिता म्हामल व हिंदी विभागप्रमुख नीलांगी शिंदे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. गोव्यातील नामवंत लेखक तथा अडवई येथील सरकारी विद्यालयातील शिक्षक चंद्रकांत गावस यांनी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता या नात्याने बोलताना ’लेखन कसे करावे’ या विषयावर मार्गदर्शन केले. चंद्रकांत गावस यांनी लिहिलेले पाठ सातवी व आठवीच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असल्याने त्यांना या कार्यक्रमासाठी आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते.
बालसाहित्य संमेलनाच्या दुस्रया दिवसाचा प्रारंभ कवयित्री शीतल साळगावकर यांनी घेतलेल्या ’कवितालेखन’ विषयावरील मार्गदर्शनसत्राने झाली. ”भुलला एक कळो…” या त्यांच्या कोकणी कवितेने हेडगेवार शाळेतील विद्यार्थ्यांची मने जिंकली. शीतल साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ’आम्र कविसंमेलना’च्या अंतर्गत शाळेच्या आवारातील आंब्याच्या झाडाखाली बसून मुलांनी सुंदर स्वरचित कविता सादर केल्या. दिगंत माळगावकर, शौर्य सावंत, इरा कुंकळीकर, महिमा नाईक, पूर्वा सावईकर, विश्वर्या गावडे, वेद आमोणकर, निधी रेगे, मुक्ता जोगळेकर, साश्वी फडते, देवानंद नाईक, सुमेधा काणकोणकर, गौतमी देसाई, आधीश सावंत, अथर्व शेटये, अर्णव बापट, रिद्धी देसाई, मयम नाईक, इशानी देसाई, गणेश कारंत, रोहित बुर्ये, उर्वी होबळे, मनस्वी गावस, मयंक कवळेकर, परिधी बेतोडकर, समीक्षा अडकोणकर, सनय बांदोडकर, कैवल्य फडके, वरद हेगडे-देसाई, अथर्व सरदेसाई, अर्जुन होबळे, आरव परब, सुवर्णा शेणवी बोरकर, आर्या परवार, विदीप सतरकर, जय मिशाळ, पवित्रा बुर्ये, विधीश्री भगत, अस्मी भगत या विद्यार्थ्यांनी संमेलनात साहित्यकृतींचे सादरीकरण केले. समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे संचालक विनय बापट यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले, की ”मुलांनी आळस बाजूला सारून स्वत:पाशी उपलब्ध असलेल्या वेळेचा योग्य रीतीने वापर करावा. लेखन करण्रायाचे निरीक्षण उत्तम असले पाहिजे”, असेही त्यांनी नमूद केले. समारोप सत्राच्या अखेरीस डॉ. के. ब. हेडगेवार शाळेचे व्यवस्थापक सुभाष देसाई यांच्या हस्ते बालसाहित्य संमेलनात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. संमेलनाची सांगता शांतिमंत्राने करण्यात आली.









