पोहत असताना अचानक दगडी विहीर ढासळल्याने ही मुले विहिरीत अडकली
सोलापूर : बोरामणी येथे एका विहिरीत पोहायला गेलेले 5 जण बुडाले असल्याची घटना समोर आली आहे. यामधील दोघांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. ग्रामस्थांसह अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात आज गुरुवारी 1 मे रोजी दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
कडक उन्हापासून आराम मिळावा यासाठी गावातील जवळपास 5 ते 6 मुलं एका शेतातील विहीरीत पोहण्यासाठी गेली होते. विहिरीत मुले पोहत असताना अचानक दगडी विहीर ढासळल्याने ही मुले विहिरीत अडकली असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस, ग्रामस्थ तसेच तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेवून बचाव कार्य केले. ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना विहिरीतून बाहेर काढण्यात आलं आहे. विहिरीत पाणी अतिशय गढूळ असल्याने तळ दिसत नाही. विहिरीत उतरलेली दोन मुले अद्यापही विहिरीतच अडकली आहेत. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांकडून या मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे गाव पातळीवर हळहळ व्यक्त होत आहे. सध्या मुलांचे सुट्ट्यांचे दिवस सुरु आहेत. कडक उन्हाळा असल्यामुळे मुलांचे विहीरी किंवा नदीवर पोहायला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलं वेळी अवेळी विहीरीवर जातात. काहीना काही दंगा मस्ती करत असतात. कुणीही वरिष्ठ व्यक्ती सोबत नसल्याने एखाद्या वेळेस काही दुर्घटना घडली तर जीवाला मुकण्याची शक्यता असते.








