विहिरींवर संरक्षक लोखंडी जाळी नसल्यामुळे शासनाच्या अनागोंदी कारभाराबद्दल नाराजी
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक गावातील नागरिकांना दररोज पिण्याचे ताजे पाणी मिळण्यासाठी शासकीय फंडातून लाखो रुपये खर्चून खोदाई केलेल्या दोन विहिरींचा तरुण मुलांना पोहोण्यासाठी वापर होत आहे. त्यामुळे सदर विहिरी शासनाने गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून खोदाई केलेत की गावातील तरुण मुलांना पोहण्यासाठी? सदर विहिरींच्यावर अजून संरक्षक लोखंडी जाळी नसल्यामुळे शासनाच्या या अनागोंदी कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एखाद्या तरुण मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्यावरच शासनाचे व ग्राम पंचायतीचे डोळे उघडणार की काय? असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होताना दिसत आहे. संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देवून दोन्ही विहिरींची पाहणी करून संरक्षक जाळी घालून पुढील धोका टाळून गावाला सदर विहिरींचे शुद्ध पाणी मिळण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे.
गावची लोकसंख्या 24 हजारांच्यावर आहे. शासनाने प्रत्येक गावामध्ये त्या त्या गावच्या लोकसंख्येच्या आधारावर पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची खोदाई केलेली आहे. कंग्राळी बुद्रुक गावातसुद्धा यापूर्वी श्री विठ्ठल रखुमाई मंदिरसमोर प्रथमम विहीर खोदाई करण्यात आली. त्यामुळे मरगाईनगर, मार्कंडेय नदीकाठावर आणि मागीलवर्षी मार्कंडेय नदीच्या पात्रापासून थोड्या अंतरावर विहिरींची खोदाई करण्यात आलेली आहे. परंतु या दोन विहिरींवर व मरगाईनगरमधील विहिरींवर संरक्षक जाळ्या बसविल्या नसल्यामुळे या दोन्ही विहिरींचा तरुण मुलांना पोहण्यासाठी वापर करण्यात येत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून गावातील तरुण मुलांना पोहण्यासाठी सदर विहिरींची खोदाई केली आहे काय? असाही संतापजनक सवाल व्यक्त होत आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरीत लक्ष देवून विहिरींवर संरक्षक जाळी बसवून शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
विहिरींची खोदाई पाणी पिण्यासाठी की पोहण्यासाठी?
आज शासन पाणी अडवा, पाणी जिरवा तसेच गावातील नागरिकांना पिण्यासाठी व इतर कामासाठी दररोज शुद्ध पाणी मिळावे म्हणूनच लाखो रुपये खर्चुन विहिरींची खोदाई करते. परंतु खोदाई केलेल्या विहिरींचे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात शासन असमर्थ ठरते. यामध्ये शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत आहे, असाही सवाल उपस्थित होत आहे. विहिरींची खोदाई झाल्यावर तसेच सर्व काम संपल्यावर प्रथम विहिरीच्यावर संरक्षक जाळी बसविणे अगदी गरजेचे असते. परंतु असे न झाल्यामुळे सदर विहिरींचा वापर तरुण मुलांना पोहण्यासाठी होत असल्याचे दिसून येत आहे.









