कोल्ड्रिफ सिरप प्रकरणानंतर केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजस्थान आणि मध्यप्रदेशात छोट्या मुलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर केंद्र सरकार सक्रीय झाले आहे. खोकला-सर्दीने ग्रस्त दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आता कुठल्याही प्रकारचे सिरप दिले जाणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासाठी देशभरातील सर्व शासकीय रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांना कठोर आदेश जारी केले आहेत.
कफ सिरप सर्वसाधारणपणे 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांकरता डॉक्टरांकडून सुचविले जात नाही. तर त्याहून अधिक वयाच्या मुलांकरता वैद्यकीय मूल्यांकन आणि देखरेखीत कफ सिरपचा वापर करता येऊ शकतो असे केंद्र सरकारच्या दिशानिर्देशात नमूद करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सेवा संचालकांना पत्र लिहित दिशानिर्देश दिले आहेत. संबंधित कफ सिरपच्या नमुन्यांचे विश्लेषण करत असून मुलांच्या मृत्यूसाठी कारणीभूत घटकांची ओळख पटविण्याची प्रक्रिया राबविली जात असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
मुलांची सुरक्षा आणि औषध नियंत्रण व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशात अलिकडेच कॉल्ड्रिफ नावाच्या सिरपच्या सेवनानंतर अनेक मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत.
या निर्देशानंतर डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय मुलांना सिरप देण्यात येऊ नये असे छत्तीसगडच्या रायगढ जिल्ह्यातील लखीराम मेडिकल कॉलेज आणि अन्य रुग्णालयांना आदेश देण्यात आला आहे. पंजाब, तेलंगणा आणि उत्तरप्रदेशने देखील खबरदारीदाखल आदेश जारी केले आहेत.
दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कुठल्याही प्रकारचे कफ सिरप देण्यात येऊ नये. छोट्या मुलांमध्ये सिरपची आवश्यकता अत्यंत कमी असते, याचमुळे नैसर्गिक पद्धतीने उपचार करण्यावर भर देण्यात येत असल्याचे लखीराम मेडिकल कॉलेजचे शिशूरोग विभागाचे प्रभारी डॉक्टर एल.के. सोनी यांनी सांगितले.
भारत सरकारच्या निर्देशानंतर सर्व विभागांना सिरप न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुलांची सुरक्षा सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि आता हा नियम कठोरपणे पाळला जाणार असल्याचे कॉलेजचे डीन डॉक्टर विनीत जैन यांनी सांगितले आहे. मुलांच्या मृत्यूनंतर आता केंद्र सरकार पूर्णपणे अलर्ट आहे.
राजस्थान सरकारने कायसन फार्माकडून पुरविण्यात येणाऱ्या सर्व 19 औषधांच्या वितरणावर बंदी घातली आहे. या कंपनीच्या कफ सिरपच्या सेवनानंतर राजस्थानमध्ये 2 मुलांचा मृत्यू झाला होता. तर मध्यप्रदेशच्या छिंदवाडामध्ये कोल्ड्रिफ कफ सिरपच्या सेवनानंतर 9 मुलांचा किडनी संसर्ग होत मृत्यू झाला होता. हे कफ सिरप तामिळनाडूच्या कांचीपुरम येथील प्रकल्पात तयार करण्यात आले होते. मध्यप्रदेश सरकारने तामिळनाडू सरकारला या कंपनीच्या प्रकल्पाची चौकशी करण्याची विनंती केली आहे.









