बर्जर पेंटस्चे प्रमुख वेंकट रमण यांचे प्रतिपादन
पणजी : पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांमध्ये जीवनातील सुरक्षा संस्कार रुजवण्याची गरज आहे. सुरक्षा ही केवळ सप्ताहापुरती मर्यादीत नसून ती जीवनाची दैनंदिन गरज आहे. जीवनामध्ये ज्या चुकांमुळे अपघात होतात त्याबद्दल मुलांना सावध करायला हवे. तसेच त्यांच्यामध्ये सुरक्षेविषयी मानसिकता तयार करण्यासाठी पालक व शिक्षकांनी त्यांच्या लहानपणापासूनच सुरुवात करायला हवी, असे प्रतिपादन बर्जर पेंटस इंडिया लिमिटेडचे कुंडई फॅक्टरीचे प्रमुख वेंकट रमण दुमपाला यांनी केले. कुंडई येथील बर्जर पेंटस इंडिया लिमिटेडतर्फे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह विविध कार्यक्रम, उपक्रमांनी साजरा करण्यात आला. लोकांमध्ये सुरक्षेसंदर्भात जागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्येही सुरक्षा जागृती करण्यासाठी आंतर विद्यालयीन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता पाचवी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटांत घेण्यात आलेल्या चित्रकाला स्पर्धेत 30 विद्यार्थी सहभागी झाले होते. पहिल्या गटातील विजेते : प्रथम : वैभवी विशाल वळवईकर, श्रीमती आय. व्ही. बी. ढवळीकर विद्यालय ढवळी फोंडा, दुसरे : ओमकार नितकांत कदम, वागळे हायस्कूल मंगेशी, तिसरे : अन्वी एन. नाईक, वागळे हायस्कूल मंगेशी. दुसऱ्या गटातील विजेते : प्रथम : चैतन्य रवी वेळीप, एस. एस. समितीचे इंदिराबाई ढवळीकर हायस्कूल, ढवळी, दुसरे : गौरांग एन. वेलिंगकर, शिक्षा सदन हायस्कूल प्रियोळ, तिसरे : जितेंद्र सिंग, न्यू इंग्लिश स्कूल, कुंडई. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या समारोप सोहळ्यात विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.









