एक तास अधिक चालले खंडपीठाचे कामकाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने शालेय मुलांचे उदाहरण देत एक मोठा संदे श दिला आहे. जर मुले सकाळी सात वाजता शाळेत जाऊ शकतात, मग न्यायाधीश आणि वकील सकाळी 9 वाजता स्वतःचे काम का सुरू करू शकत नाहीत असा प्रश्न न्यायाधीश यू. यू. ललित यांनी उपस्थित केला. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने सर्वसामान्य दिवसांच्या तुलनेत एक तास पूर्वीच काम सुरू केले. न्यायाधीश यू.यू. ललित, एस. रविंद्र भट आणि सुधांशू धूलिया यांच्या खंडपीठाने सकाळी साडेना वाजता सुनावणी सुरू केली. परंतु सर्वसाधारणपणे ही सुनावणी सकाळी साडेदहा वाजता सुरू होते.
न्यायाधीश ललित हे भावी सरन्यायाधीश आहेत. माझ्या मतानुसार सकाळी 9 वाजता कामकाज सुरू केले जावे. जर मुले सकाळी 7 वाजता शाळेत जाऊ शकतात, मग आम्ही सकाळी 9 वाजता का येऊ शकत नाही असे न्यायाधीश ललित यांनी म्हटले आहे. एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी हजर राहिलेले वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी वेळेपूर्वी कामकाज सुरू केल्याप्रकरणी खंडपीठाचे कौतुक केले.
न्यायालयांचे कामकाज सुरू करण्याची योग्य वेळ सकाळी साडेनऊ वाजताची आहे. जर न्यायालयांचे कामकाज लवकर सुरू झाल्यास दिवसभराचे काम लवकर संपणार आहे. न्यायाधीशांना दुसऱया दिवशीच्या प्रकरणांच्या फाइल्स वाचण्यासाटी संध्याकाळी अधिक वेळ मिळेल. न्यायालय सकाळी 9 वाजता काम सुरू करून सकाळी साडेअकरा वाजता एका तासांच्या विश्रांतीनंतर दुपारी दोन वाजेपर्यंत दिवसभराचे कामकाज संपवू शकते असे न्यायाधीश ललित यांनी म्हटले आहे.
दीर्घ सुनावणीची आवश्यकता नसलेल्या प्रकरणांची आणि केवळ नव्या प्रकरणांची सुनावणी होणार असेल तरच ही व्यवस्था काम करू शकते असेही न्यायाधीश ललित यांनी नमूद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सकाळी साडेदहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत विविध प्रकरणांची सुनावणी करत असतात. सरन्यायाधीश एन.व्ही. रमन हे 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर ललित हे सरन्यायाधीश होणार असून त्यांचा कार्यकाळ आठ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.









