उघड्यावरील तलाव धोकादायक, बालकांनी खबरदारी घेणे आवश्यक
बेळगाव : वाढत्या उष्म्यामुळे तलाव, नाले आणि विहिरींमध्ये पोहणाऱ्या बालकांची संख्या वाढू लागली आहे. मात्र खोल तलाव आणि नाल्यामध्ये पोहणे धोकादायक आहे. विविध योजनेंतर्गत खोदण्यात आलेले शेततलावही पोहणाऱ्यांना धोकादायक आहेत. अतिधोकादायक ठिकाणी उतरू नये आणि पालकांनीही पाल्यांकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे. जिल्ह्यात विविध योजनेंतर्गत शेततलावांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या तलावांच्या सभोवती तारांचे कुंपण किंवा हिरवा पडदादेखील बसविण्यात आला नाही. त्यामुळे पोहण्याचा आनंद लुटणाऱ्या बालकांसाठी हे तलाव धोकादायक आहेत. शाळांना सुटी पडल्यामुळे मुले तलाव, नदी, विहिरी, क्वॉरींमध्ये पोहण्यासाठी उतरू लागली आहेत. मात्र खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. यापूर्वी अनेकवेळा बालकांना जीव गमवावा लागला आहे. विशेषत: ग्रामीण भागात पालकांना माहिती न देताच पोहायला जाणाऱ्या बालकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पालकांनीही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
बालकांची सुरक्षितता ऐरणीवर
महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनेंतर्गत शेततलावांची निर्मिती करण्यात आली आहे. या तलावांमध्ये पावसाचे पाणी साचून आहे. मात्र या तलावांना संरक्षण कुंपण नाही. जिल्ह्यात अशा तलावांची संख्या मोठी आहे. दरम्यान उकाड्यातून थंडावा मिळविण्यासाठी या तलावात लहान बालके उतरू लागली आहेत. त्यामुळे बालकांची सुरक्षितता ऐरणीवर येवू लागली आहे. अशा तलावांना कुंपण आणि पडदे बसवावेत, अशी मागणीही होऊ लागली आहे.
शेतीच्या तलावांकडे मुलांनी जाऊ नये!
शेततळ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र लाभार्थीही उदासीन असल्याचे दिसत आहे. शेतीच्या तलावांकडे जावू नये यासाठी शाळास्तरावर मुलांमध्ये जागृती केली जात आहे. पालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
-शिवनगौडा पाटील (सहसंचालक कृषी खाते)









