बेळगाव : जिल्हा बाल संरक्षण समितीच्यावतीने शहरात बालकामगार शोधमोहीम अभियान राबविण्यात आले. डीसीपीओ डॉ. प्रवीण शेख यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध ठिकाणी चार तुकड्यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानक, राणी चन्नम्मा सर्कल आदी ठिकाणी जाऊन भीक मागणारी, विविध साहित्य विकणारी, अनेक ठिकाणी काम करणाऱ्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले. जर 18 वर्षांखालील मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास, शारीरिक-मानसिक छळ, हिंसाचार, दुर्लक्ष, भेदभाव आणि शोषण होत असेल तर विभागाने 1098/112 ही हेल्पलाईन सुरू केली आहे. जर कोणतीही मुले पळून गेली, त्यांची तस्करी झाली,
त्यांच्यावर अत्याचार झाले, काही ठिकाणी बाल आणि किशोरवयीन मुलांना कामगार म्हणून ठेवणे, बालविवाहाला बळी पडणे, भीक मागणे, शाळेत सतत अनुपस्थित राहणे, कोणत्याही आपत्तीत सापडणे आणि त्यांना संगोपन आणि संरक्षणाची गरज भासल्यास या हेल्पलाईनवर संपर्क साधून माहिती देता येणार आहे. रस्त्यावर भीक मागणे, हॉटेल-दुकाने आदी ठिकाणी काम करणे, गर्दीच्या ठिकाणी साहित्य विक्री करणाऱ्या बालकांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी मुलांचा मानसिक व शारीरिक छळ करून त्यांना अन्य कामासाठी प्रवृत्त केले जाते. यासाठी जिल्हा बाल संरक्षण समितीच्यावतीने शहरात बालकामगार शोधमोहीम राबविण्यात आली.









