सहा महिन्यांपासून पुरवठा बंद : महिला-बालकल्याण खात्याचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांना मागील सहा महिन्यांपासून दूध पावडरचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे लहान मुले, गर्भवती व बाळंतिण महिलांना वंचित राहावे लागत आहे. महिला व बालकल्याण खात्याच्या दुर्लक्षपणाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. शिवाय बालकांच्या कुपोषणाबाबतही च्ंिाता व्यक्त होऊ लागली आहे.
बालकांतील कुपोषण कमी व्हावे, गर्भवती व बाळंतिणींना पौष्टिक आहार उपलब्ध व्हावा, यासाठी क्षीरभाग्य योजनेंतर्गत दूध पावडरचा पुरवठा केला जात होता. मात्र मागील काही दिवसांपासून दुधाचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना सकस आहारापासून दूर राहावे लागले आहे. 0 ते 3 आणि 3 ते 6 वयोगटातील बालकांना मलईयुक्त दूध दिले जात होते. मात्र, आता केएमएफकडून दुधाचा पुरवठा बंद झाल्याने दूध देणेदेखील बंद झाले आहे. त्यामुळे काही भागात पुन्हा कुपोषित बालकांची संख्या वाढू लागली आहे. गर्भवती महिलांना सकस आहार पुरविला जातो. त्याचबरोबर दूध पावडरही दिली जात होती. मात्र, आता केवळ सकस आहार दिला जात आहे.
जिल्ह्यात 5 हजार 331 अंगणवाडी केंद्रे आहेत. अलीकडे त्यामध्ये नवीन अंगणवाड्यांचीही भर पडली आहे. त्यामध्ये 4 लाख 10 हजार 648 बालके, 48 हजार 931 गर्भवती महिला तर 47 हजार 889 बाळंतिणींची संख्या आहे. मात्र, या सर्व लाभार्थ्यांना दूध पावडरपासून वंचित राहावे लागले आहे. जिल्ह्यातील अंगणवाड्यांना दरमहा 3 लाख किलो दूध पावडरचा पुरवठा केला जात होता. मात्र, ऑक्टोबरपासून कर्नाटक दूध महामंडळाने दुधाचा पुरवठा बंद केला आहे. दूध पावडरच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील हजारो बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात दुधाचा पुरवठा कमी असल्यास शेजारच्या राज्यांची मदत घ्यावी आणि दूध पावडरचा पुरवठा अंगणवाड्यांना सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.









