वृत्तसंस्था / मोरैना
एक महिला आणि तिचा प्रियकर यांनी या महिलेच्या अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना मध्यप्रदेशातील मोरैना येथे घडली आहे. या मुलाने त्याच्या मातेच्या तिच्या प्रियकराशी असलेल्या अनैतिक संबंधांना विरोध केला होता. त्यामुळे या दोघांनी कट करुन त्याची हत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे.
या महिलेचे नाव उघड करण्यात आलेले नसून प्रियकारचे नाव रफिक खान असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रफिक खान याच्याशी असलेले या महिलेचे अनैतिक संबंध या अल्पवयीन मुलाला मान्य नव्हते. त्याने विरोध केला होता, तसेच या संबंधांची माहिती त्याने त्याला पिता (या महिलेचा पती) लोकेंद्र कुशवाह याला दिली होती. त्यामुळे ही महिला आणि रफिक खान या दोघांनी या मुलाची हत्या केली. दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्हा कबूल केला असल्याची माहिती मोरैनाचे पोलिस प्रमुख गोपाल सिंग धाकड यांनी दिली.
इन्स्टाग्रामवरुन लागला शोध
हत्या झालेला 13 वर्षांचा हा मुलगा काही दिवसांपूर्वीपासून बेपत्ता होता. त्यामुळे त्याचे पिता लोकेंद्र कुशवाह यांनी पोलिसात तक्रार सादर केली होती. पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर त्याचा मृतदेह घरापासून काही किलोमीटर अंतरावर आढळून आला. त्यामुळे हत्या प्रकरण नोंद करण्यात आले. या मुलाला रफिक खान यानेच आपल्या बाईकवरुन नेल्याचे एका इन्स्टाग्राम रील वरुन स्पष्ट झाल्याने रफिक खान याची चौकशी करण्यात आली. त्यातून या मुलाची माता आणि रफिक खान यांच्या अनैतिक संबंधांचा पर्दाफाश झाला. तसेच हा खून हे संबंध लपविण्यासाठी झाल्याचेही स्पष्ट झाले, अशी माहिती देण्यात आली आहे.









