पाटकुल / सुहास परदेशी :
‘उद्या माझा वाढदिवस… मामाकडून पैसे घेऊन मी शाळेत सगळ्यांना चॉकलेट वाटणार… संध्याकाळी माझ्या वाढदिवसाला मम्मी पप्पा येणार आहेत… तुम्ही सगळे माझ्या वाढदिवसाला या…’ असा निरोप विराजने आज दिवसभर शाळेतील सर्व मित्र-मैत्रिणींना दिला… शाळा सुटली… घरी आला… जेवण केलं… आणि मित्रांसोबत उजनीच्या कालव्यात पोहायला गेला… मात्र उद्या होणाऱ्या वाढदिवसाचे स्वप्न त्याचं भंग पावलं… आणि आजच विराजला मृत्यूने जवळ केले. उजनीच्या कालव्यात बुडून विराजचा मृत्यू झाला.
सविस्तर माहिती अशी की, कामती खुर्द लमाण तांडा येथील श्री परमेश्वर आश्रम शाळा येथील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणारा विराज विनोद राठोड (वय – ८ वर्ष) याचा उजनीच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला. आजोबा मल्लिनाथ कल्लू चव्हाण यांच्याकडे शिकायला असणारा विराज नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर चिमुकल्या मित्रांसोबत कॅनॉल मध्ये पोहायला गेला. वास्तविक पाहता तो पोहायला शिकत होता, मात्र मला पोहायला येतंय असा सर्व चिमुकल्यांचा समज झाला. आणि उजनी कालव्याच्या वाहत्या पाण्यात विराज विनोद राठोड व साईराज संतोष राठोड हे दोघं वाहून चालली. कॅनलवर असणाऱ्या काही चिमुकल्यांनी आरडाओरड केली. त्यावेळी त्यांची ही आरडा ओरड पाहून सुनील चव्हाण या युवकाने तत्परता दाखवत साईराजला वाचवण्यात यश मिळविले , मात्र विराज हाताला लागलाच नाही.
खरं तर २८ मार्च रोजी विराजचा नववा वाढदिवस… या वाढदिवसाच्या निमित्ताने विराज आज दिवसभर शाळेत उद्याच्या वाढदिवसाची तयारीत असल्याचे सांगत होता. विराज हा मामा दीपक चव्हाण यांच्याकडे शाळेला शिकायला आलेला. वडील विनोद राठोड व आई मोलमजुरी करून पोट भरणारे दाम्पत्य. विराजचा गेल्या तीन दिवसापासून वाढदिवसाला येण्यासाठी आग्रह होता. एखादा ड्रेस व केक घेऊन चिमुकल्याच्या वाढदिवसाला जाण्याची त्यांनीही तयारी केली होती. मात्र वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच काळाने घात केला.








