दापोली :
दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या लिफ्टसाठी केलेल्या पाण्याने भरलेल्या 10 फूट खोल खड्ड्यात बुडून समीर श्रीकांत चव्हाण या 5 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू ओढवला. त्याच्यासोबत खेळत असणारा त्याचा भाऊ राजेश हा मात्र या दुर्दैवी प्रकारातून बचावला. गुरुवारी दुपारी 3 वाजता हा प्रकार उघडकीस आला. सोलापूर येथून बुधवारीच पोटाची खळगी भरण्यासाठी वडिलांबरोबर येथे आलेल्या समीरबाबत घडलेल्या या दुर्दैवी प्रकाराने दापोलीत हळहळ व्यक्त होत आहे.
यात मृत्यूमुखी पडलेला समीर चव्हाण व राजेश चव्हाण (4) हे दोघेजण वडील श्रीकांत चव्हाण यांच्यासोबत सोलापूर येथून बुधवारी दापोलीत आले होते. ते मूळचे सोलापूर जिह्यातील आहेत. घरी अत्यंत गरिबीची स्थिती असल्यामुळे दापोलीत काम शोधण्यासाठी श्रीकांत चव्हाण आले होते. ते येताना सोबत आपल्या दोन मुलांना घेऊन आले.
- दोन मुलांना सोडून वडील गेले काम शोधण्यासाठी
पोलिसांनी देलेल्या माहितीनुसार, श्रीकांत चव्हाण हे जेसीबी चालक म्हणून काम करतात. दापोलीत आल्यावर त्यांच्याकडचे सर्व पैसे संपले होते. आपल्या दोन लहान मुलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी उपजिल्हा ऊग्णालयासमोर सेवार्थ देण्यात येणाऱ्या मोफत जेवणाच्या ठिकाणी या दोन चिमुरड्यांना सोडले व ते काम शोधण्यासाठी निघून गेले. उपजिल्हा ऊग्णालयासमोर मिळणारे मोफत जेवण जेवून समीर आणि राजेश हे तेथेच खेळत होते.
- खेळता-खेळता समीर पडला टाकीत
खेळता-खेळता समीर हा उपजिल्हा रुग्णालयालगत सुरू असणाऱ्या नव्या इमारतीच्या बांधकामाजवळ गेला. खेळता-खेळता तो या इमारतीच्या लिफ्टसाठी केलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला. आपला भाऊ पाण्याच्या खड्ड्यात पडल्याचे पाहून राजेश हा एकटाच तेथील शेडमध्ये बसून राहिला. तेथे रुग्णाला पहायला आलेल्या योगेश जाधव यांना संशय आला. म्हणून त्यांनी त्याची विचारपूस केली. यावेळी राजेश याने रडत-रडत लिफ्टच्या टाकीकडे बोट दाखवले. त्यानंतर त्यांनी लिफ्टच्या टाकीजवळ जाऊन पाहिले असता समीरचा मृतदेह पाण्याच्या खड्ड्याच्या खाली तळात आढळला. त्याला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
ही दुर्दैवी घटना घडल्याचे कळताच दापोलीतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. तसेच दापोलीच्या नगराध्यक्ष कृपा घाग व तहसीलदार अर्चना बोंबे, दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनीही घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली. शिवाय लिफ्टच्या खड्ड्याच्या मोकळ्dया बाजूला तातडीने फळ्dया लावून ती जागा बंद करण्याचे आदेश नगराध्यक्ष कृपा घाग व तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम दापोली पोलीस ठाणेत रात्री उशिरापर्यंत सुरू होते.








