वडगाव येथील सोमवारची घटना
बेळगाव : मातीवाहू ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडल्याने सात वर्षांच्या बालकाचा चिरडून मृत्यू झाला. आरुष महेश मोदेकर (वय 7 रा. सिद्धेश्वरनगर इंडाल रोड, कणबर्गी) असे त्याचे नाव आहे. सोमवार दि. 27 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास बाळकृष्णनगर दुसरा क्रॉस वडगाव येथे ही घटना घडली आहे. अपघाताची नोंद दक्षिण रहदारी पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी की, कणबर्गी येथील मोदेकर यांच्या नातेवाईकांमध्ये चार दिवसांपूर्वी लग्न झाले होते. त्यामुळे सोमवारी बाळकृष्णनगर दुसरा क्रॉस वडगाव येथे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. सदर रिसेप्शनसाठी आरुष हा आपल्या आईसोबत गेला होता. सायंकाळी 7 च्या दरम्यान रिसेप्शन संपवून सर्वजण घरी जाण्याच्या तयारीत
असतानाच आरुष हा अन्य मुलांसोबत खेळत होता. खेळता खेळता रस्त्यावर गेला. त्यावेळी मातीची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने त्याला चिरडले. डोक्यावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मुलाचा डोळ्यासमोर मृत्यू झाल्याने आईने एकच आक्रोश केला. उपलब्ध माहितीनुसार आरुष हा आईवडिलांना एकुलता होता. अपघाताची माहिती समजताच दक्षिण रहदारी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास चालविला आहे.









