वार्ताहर/धामणे
राजहंसगड गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवात बाल युवकांच्यावतीने गल्लोगल्ली किल्ल्यांची प्रतिकृती तयार केल्या जातात. त्याच पद्धतीने यंदाही येथील बाल युवकांनी प्रत्येक गल्लीत वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. येथील मारुती गल्ली येथे साकारलेल्या प्रतापगडाची प्रतिकृती केलेली आहे. त्याचे दि. 24 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात येवून आरती करण्यात आली. त्यानंतर मारुती गल्ली येथे साकारण्यात आलेल्या प्रतापगडाच्या किल्ल्याचे फीत कापून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी हनुमान तालिम युवक मंडळातर्फे उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकट पाटील, ग्रा. पं. माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य अरविंद पाटील, सिद्धाप्पा छत्रे, ग्रा. पं. सदस्य जोतिबा थोरवत, पंच कमिटी अध्यक्ष शाम थोरवत, हणमंत नावगेकर, गुरुदास लोखंडे आदी उपस्थित होते. प्रतापकडाच्या प्रतिकृतीबद्दल उपस्थित मान्यवरांनी बालयुवकांचे कौतुक केले. कार्यक्रमाला गावातील युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाऊ पवार यांनी आभार मानले.









