वर्षापूर्वीची घटना : पोक्सो न्यायालयात आरोप सिद्ध
बेळगाव : चॉकलेटचे आमिष दाखवून चार वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर केवळ वर्षभरात घटनेचा निकाल लागला. निसारअहमद फव्रुसाब चापगावी (वय 68) रा. काकर गल्ली, नंदगड असे त्याचे नाव आहे. येथील पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी गुरुवारी लैंगिक अत्याचाराचे आरोप सिद्ध झाल्याने निसारअहमदला शिक्षा ठोठावली आहे. तो सध्या हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. नंदगड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली होती.
चार वर्षाच्या बालिकेला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून निसारअहमदने तिला आपल्या घरी नेले होते व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. 27 फेब्रुवारी 2024 रोजी या घटनेसंबंधी नंदगड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील यांनी 17 एप्रिल 2024 रोजी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोक्सो न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. 28 फेब्रुवारी 2024 रोजी आरोपी निसारअहमदला अटक करून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. तपास साहाय्यक म्हणून आर. एस. केमाले यांनी काम पाहिले होते. या प्रकरणाची सुनावणी होऊन गुरुवार दि. 3 एप्रिल रोजी येथील पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी आरोपीला 20 वर्षे कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारतर्फे एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.









