ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भीक मागण्यासाठी लहान मुलांची चोरी करण्याऱ्या दिल्लीकर महिलेला बोरीवली सीआरपी पोलिसांनी दादर रेल्वे स्टेशनमधून अटक केली आहे. या महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीवली रेल्वे स्थानकातून 8 सप्टेंबरला एका तीन वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली. पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला या मुलाला घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी खबऱ्यांच्या मदतीने आरोपी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर दादर रेल्वे स्थानकातून या महिलेला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली.
अधिक वाचा : बेल्टमधून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावर 12 किलो सोने जप्त
आरोपी महिला दिल्लीतील असून, तीन दिवसांपूर्वी ती आपल्या दोन अल्पवयीन मुलांसह मुंबईत आली होती. फिर्यादी महिलेसोबत तिने ओळख वाढवली आणि संधी मिळताच या महिलेच्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन पळून गेली. या घटनेत आरोपी महिलेच्या दोन्ही मुलांनीही तिची साथ होती. या लहान मुलाचे अपहरण करुन त्याला दिल्लीत नेऊन भीक मागायला लावण्याचा या महिलेचा प्लॅन होता. पण त्याआधीच पोलिसांनी तीला अटक केली. पोलिसांनी तीन वर्षांच्या मुलाला सुखरूपपणे त्याच्या आईच्या स्वाधीन केलं.









