सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा फंडा सुरूच
बेळगाव : ट्रेडिंगच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार थांबता थांबेनात. चिकोडी येथील एका मोबाईल दुकानदाराला साडेअठरा लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना ताजी असतानाच चिकोडी येथील आणखी एका शिक्षकाला सायबर गुन्हेगारांनी सुमारे 30 लाख रुपयांहून अधिक रकमेला ठकवले आहे. जिल्हा व शहर सायबर क्राईम विभागाकडून सातत्याने जागृती करूनही लोक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. चिकोडी येथील शिवानंद नामक एका शिक्षकाला गुन्हेगारांनी मोठ्या प्रमाणात ठकवले आहेत. ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा, दामदुप्पट परतावा देण्यात येईल, असे सांगत त्यांची फसवणूक केली आहे. सोशल मीडियावर आलेल्या ट्रेडिंगच्या जाहिरातीवर विश्वास ठेवून या शिक्षकाने सुरुवातीला थोडी रक्कम गुंतवणूक केली.
त्याच्या बदल्यात सायबर गुन्हेगारांनी परतावाही दिला. हळूहळू 30 लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्यानंतर सायबर गुन्हेगारांचा संपर्क बंद झाला. त्यामुळे आपण फसलो गेलो, याची शिक्षकाला कल्पना आली. 27 जून ते 30 जुलै या वेळेत केवळ महिन्याभरात जास्तीचा नफा मिळविण्याच्या आशेने चिकोडी येथील एका शिक्षकाने तब्बल 30 लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. नफा तर नाहीच त्यांनी गुंतवलेली रक्कमही मिळवणे कठीण झाले आहे. आपण फसलो गेलो हे लक्षात येताच संबंधितांनी सायबर क्राईम विभागाकडे धाव घेतली आहे.यापूर्वी ट्रेडिंगच्या नावाने होणाऱ्या फसवणूक प्रकरणात पोलीस गुन्हेगारांचे बँक खाते गोठवत होते. त्यामुळे गुंतवणूकदाराला थोडी रक्कम तरी परत मिळत होती. आता सायबर गुन्हेगार झटपट आपले बँक खाते रिकामे करत आहेत. त्यामुळे गुंतवलेला पैसा मिळविणेही तपास यंत्रणेला डोकेदुखीचे ठरत आहे. ज्या खात्यावर पैसा जमा झाला आहे, तो खातेदार सापडला तरी गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे पोलिसांना कठीण जात आहे.









