पर्यटकांच्या हुल्लडबाजीला बसणार आळा
वार्ताहर/कणकुंबी
चिगुळे येथील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेल्या श्री माउलीदेवी मंदिराच्या परिसरात वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून हुल्लडबाजीचे प्रकार करण्याबरोबरच पार्ट्या करून जवळच्या जलकुंडात केरकचरा आणि मद्याच्या बाटल्या टाकल्यामुळे जलकुंड दूषित होत आहे. म्हणून चिगुळे पंचकमिटी व ग्रामस्थांकडून जलकुंडालाच लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे. त्यामुळे आता जलकुंडाला संरक्षण मिळाले आहे. मागील आठवड्यात चिगुळे येथील श्री माउलीदेवी मंदिराच्या मुख्य दरवाज्याचा कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच मंदिर परिसरात मद्यपान करून प्लास्टिक ग्लास व बाटल्या जलकुंडात फेकल्याची निंदनीय घटना घडली होती. अशाप्रकारे जलकुंडात मद्याच्या रिकामी बाटल्या किंवा प्लास्टिकच्या वस्तू टाकून पवित्र जलकुंड दूषित करण्याचा प्रकार वारंवार घडत होते. मात्र यावर उपाय म्हणून चिगुळे गावच्या पंचकमिटीने जलकुंडाला लोखंडी जाळी बसवून जलकुंडाचे रक्षण केले. पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे चिगुळे गावातील महिलांना तसेच आबालवृद्ध नागरिकांना देखील यांचा त्रास होत आहे.
कुंडातील पाण्याचा देवीला अभिषेक
कणकुंबी आणि परिसरातील वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून हुल्लडबाजी आणि दंगामस्ती करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. चिगुळे येथील श्री माउलीदेवीच्या परिसरातील पवित्र असे ‘गंगा भागिरथी तीर्थकुंड’ आहे. त्याला चिगुळे ग्रामस्थ पाण्याची तळी असे म्हणतात. या जलकुंडातील पाणी विविध सणांच्या वेळी देवीला अभिषेक घालण्यासाठी वापरतात. श्री माउलीदेवी मंदिराला लागूनच असलेल्या जलकुंडात अनेकवेळा तरुण तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांकडून प्लास्टिक ग्लास, बॉटल किंवा मद्याच्या रिकामी बाटल्या टाकल्या जात आहेत. यासाठी जाळी बसवण्यात आली आहे.









