शिरोळ प्रतिनिधी
Shirol Crime News : घराचा बांधकाम परवाना मंजुरीसाठी एक लाख 75000 रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी शिरोळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत मारुती हराळे (वय-33) मुळगाव भिलवडी जि. सांगली सध्या राहणार शिरोळ ,कनिष्ठ अभियंता संकेत हणमंत हंगरगेकर( वय -28) सध्या राहणार जयसिंगपूर मुळगाव उस्मानाबाद जि.उस्मानाबाद, लिपिक सचिन तुकाराम सावंत राहणार शिरोळ खाजगी इसम अमित तानाजी संकपाळ (वय -42) राहणार शिरोळ या चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ माजली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.याप्रकरणी शिरोळ येथील इसमाने तक्रार दाखल केली होती.
यातील तक्रारदार यांनी शिरोळ येथील नंदीवाले वसाहत रोडवरील बिगर शेती प्लॉटमध्ये घर बांधण्यासाठी बांधकाम परवान्याची मागणी शिरोळ नगर परिषदेकडे केली होती. बांधकाम परवाना मिळवण्यासाठी संबंधित तक्रारदार हे पालिकेकडे वारंवार हेलपाटे मारत होते. या-ना त्या कारणास्तव त्यांना बांधकाम परवाना दिला जात नव्हता. बांधकाम परवाना हवा असेल तर तक्रारदार यांनी मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांना फाईल मंजुरीसाठी 75 हजार रुपये तसेच बांधकाम परवान्याची फाईल पुढे पाठवण्यासाठी कनिष्ठ अभियंता संकेत हंगरगेकर व लिपिक सचिन सावंत यांना एक लाख रुपये द्यावेत, त्यानंतर बांधकाम परवाना देण्यात येईल असे तक्रारदारांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबत तक्रारदारांनी या घटनाक्रमाची इथंभूत माहती रेकॉर्ड करून लाचेची मागणी केल्याची तक्रार कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची खातरजमा करून सोमवारी सापळा रचला. तथापि नगरपालिकेची विशेष सभा असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक नगरपालिकेच्या परिसरात ठीक ठिकाणी थांबले होते. सभा संपल्यानंतर तक्रारदार यांनी नगरपालिकेचे बांधकाम अभियंता संकेत हंगरगेकर व पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांच्या दालनात जाऊन बांधकाम परवाना मंजुरी बाबत विचारपूस केली. बांधकाम पुरवण्याची फाईल मंजुरीसाठी देण्यात येणारी रक्कम कोणाकडे द्यायचे हे विचारले असता मुख्याधिकारी हराळे व कनिष्ठ अभियंता हंगरगेकर यांनी लिपिक सचिन सावंत यांच्याकडे द्यावेत असे सांगितले. तर सावंत यांनी आपण बाहेर असल्यामुळे सदरची रक्कम खाजगी अमितसंकपाळ यांच्याकडे देण्याचे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी संकपाळ यांच्याकडे ठरलेली एक लाख 75 हजार रुपये रोख रक्कम दिली .
लाच स्वीकारण्याची खात्री झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रंगेहाथ पकडले. खाजगी इसम अमित संकपाळ, लिपिक सचिन सावंत, कनिष्ठ अभियंता संकेत हंगरगेकर व मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांना लाच स्वीकारल्या प्रकरणी ताब्यात घेऊन त्यांना अधिक चौकशीसाठी येथील शासकीय विश्रामगृहात आणण्यात आले. या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत प्रकरणाचे जबाब घेऊन पंचनामा करून रात्री उशिरा शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, पोलीस हवालदार विकास माने, मयूर देसाई विष्णू गुरव, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश माने यांच्या पथकाने केली.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









