प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांचा फोन ईन कार्यक्रम शनिवारी होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत पोलीस प्रमुख नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकणार आहेत. या कार्यक्रमाला संपूर्ण जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील नागरिकांना सहजपणे आपल्यापर्यंत समस्या, तक्रारी पोहोचविता याव्यात, यासाठी डॉ. संजीव पाटील यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात बंदोबस्ताचा ताण असूनही त्यांनी हा कार्यक्रम राबविला.
यासाठी 0831-2405226 हा क्रमांकही पोलीस प्रमुखांनी जाहीर केला आहे. पोलीस स्थानकात नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात आहेत का?, पोलीस सर्वसामान्य नागरिकांशी सौजन्याने वागत आहेत का?, महिला, मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत का? याविषयी नागरिकांनी पोलीस प्रमुखांशी थेट संपर्क साधून सल्ला, सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रत्येक 15 दिवसांनंतर येणाऱ्या शनिवारी फोन ईन कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात नागरिकांनी पोलीस प्रमुखांशी संपर्क साधून आपल्या परिसरात सुरू असलेल्या मटका, जुगार, अमलीपदार्थांची विक्री आदी गैरधंद्यांविषयी माहिती दिली असून नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित कारवाईही केली आहे. शनिवारी सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत नागरिकांना आपल्या समस्या मांडता येणार आहेत.









