जनरल मनोज पांडे सिक्कीममध्ये तर व्ही. आर. चौधरी जम्मूमध्ये
सिक्कीम / वृत्तसंस्था
भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सिक्कीममधील एलएसीजवळ सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. तसेच तेथील सुरक्षा परिस्थितीचा आढावाही घेतला. जनरल पांडे यांनी रविवारी आणि सोमवारी उत्तर बंगालमधील लष्करी तळ आणि सिक्कीमच्या सीमावर्ती भागाला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी सर्व सैनिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सुरक्षाविषयक तयारीचा आढावा घेतला. सीमाभागात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचाही त्यांनी आढावा घेतला आणि कामाच्या गतीबद्दल समाधान व्यक्त केले. दरम्यान, वायुसेना प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी जम्मूमध्ये एलओसीजवळ तैनात जवानांसोबत दिवाळी साजरी केली. नियंत्रण रेषेजवळ तैनात जवानांसह त्यांनीही मिठाईचा आस्वाद घेतला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी जवानांना मिठाईचे वाटप केले.
लष्करप्रमुख जनरल पांडे यांनी आपल्या बंगाल आणि सिक्कीम भेटीदरम्यान कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज आणि सतर्क असलेल्या सैनिकांचे कौतुक केले. दिवाळी सण सुरू असल्याने त्यांनी सैनिकांसोबत मिठाईचा आस्वादही घेतला. या भेटीत पूर्व विभागाचे लष्करी कमांडर लेफ्टनंट जनरल आर. पी. कलिता हेही त्यांच्यासोबत होते. लष्करप्रमुख जनरल पांडे रविवारी सुखना लष्करी तळावर पोहोचले होते. भारतीय संस्कृती, सांस्कृतिक वारसा आणि विविधतेतील एकता दर्शवण्यासाठी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी लष्करप्रमुखांनी उत्तर आणि पूर्व सिक्कीममधील सीमावर्ती भागाला भेट दिली. यावेळी सिक्कीम सेक्टरमध्ये तैनात केलेल्या जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.









