पुणे / प्रतिनिधी :
खराब हवामानामुळे आपल्याला मुंबईहून पुण्याला कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही, त्यामुळे माझ्या वतीने तुम्हीच पुलाचे उद्घाटन करा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी मला केल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शुक्रवारी दिली. चालू कार्यक्रमातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोन आल्याचे पाटील यांनी माध्यमांना सांगितले.
पुण्यातील पाषाण सुस खिंड पुलाच्या लोकार्पण सोहळय़ासाठी शिंदे उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या वेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विलास कानडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेते गणेश बीडकर आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : पुण्यातील ‘सेक्स तंत्र’ शिबीर अखेर रद्द
पाटील म्हणाले, पाषाण-सूसला जोडणारा उड्डाणपूल हा हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्कच्या बाजूला होणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार असून वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास बऱ्याच अंशी मदत होईल. शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे. परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि त्यासाठी वाहतूक वळवण्यासाठी काही बाबतीत हा पूल उपयुक्त होईल. पुणे शहराची गतीने वाढ होत आहे. उद्योग, व्यापार, शैक्षणिक क्षेत्र आदींमध्ये शहर पुढे राहण्यासाठी रस्ते, उडाणपूल, मेट्रो, पूल आदी पायाभूत सुविधांची निर्मिती गरजेची आहे. चांगल्या प्रकारचे घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाण्याची व्यवस्था, शांतता आदीमुळे सर्वांनाच हे शहर राहण्यासाठी सुरक्षित वाटते. येत्या काळात शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.