विशेष प्रतिनिधी /पणजी
मोप आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पाला केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाने एरोड्रोम परवाना बहाल केल्यामुळे हा विमानतळ प्रकल्प त्वरित कार्यान्वित करण्यासाठी गोवा सरकारला उत्सुकता लागली असून केवळ पंतप्रधानांकडून हिरवा कंदील मिळविण्याची प्रतीक्षा गोवा सरकार करीत आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत प्रकल्पाचे उद्घाटन व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न चालविले आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे व मोप विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन आपल्या हस्ते व्हावे अशी आशा व्यक्त केली आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयातील गुप्तचर यंत्रणेने मोप विमानतळ तसेच गोव्यातील पोलीस अधिकाऱयांबरोबर सुरक्षेचा आढावाही घेतला आहे. पंतप्रधानांनी कुठून कसे यावे याबाबतचा कार्यक्रमही निश्चित केलेला आहे. केवळ पंतप्रधान यांच्याकडून गोवा भेटीचा कार्यक्रम निश्चित झालेला नाही. 20 नोव्हेंबरच्या दरम्यान पंतप्रधान बंगळूरला विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी जाणार आहेत. तिथून ते गोव्यात येऊन मोप प्रकल्पाचे उद्घाटन करतील काय? याबाबत मुख्यमंत्री प्रयत्न करीत आहेत. दि. 11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या दरम्यान पंतप्रधानांनी गोव्यात यावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठविलेले आहे.









