राधानगरी प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ अशा राधानगरी तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या विकास करण्यासाठी औद्योगिक वसाहत (MIDC) उभारणी करण्याकरिता उद्योगमंत्र्यांनी तातडीने बैठकीचे आयोजन करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या निवेदनाप्रमाणे दिल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
कोल्हापूर शहरापासून 35 ते 40 कि.मी. अंतरावर असलेला राधानगरी तालुका असून तालुक्यात कोणताही मोठा औद्योगिक प्रकल्प नाही. तालुक्यामध्ये दाजीपूर वन्यजिव अभायारण्य असल्याने बहुतांशी क्षेत्र अभयारण्याच्या कार्यकक्षेमध्ये येते. तसेच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सह्याद्री पर्वत रांगातील इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये तालुक्यातील ठरावीक क्षेत्र समाविष्ठ असल्याने औद्योगिकीकरणास मर्यादा येत आहेत. त्यामुळे येथील सुशिक्षीत बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराकरीता जिल्ह्यासह अन्य मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. राधानगरी तालुक्यामध्ये औद्योगिक प्रकल्प उभारणी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली असून याबाबत तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश देत उद्योगमंत्री यांनी तातडीने बैठकीचे आयोजन करून पुढील योग्य ती कार्यवाही करावी असे आदेश दिलेले आहेत.
त्यामुळे राधानगरी तालुक्यामध्ये औद्योगिक वसाहत उभारणी करण्याकरीता आवश्यक असणारे पहिले पाऊल पडलेले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन संपादीत करण्याकरीता गायरानसह मुलकीपड व इतर शासकीय जमीनी अधिगृहीत करण्याबाबत कार्यवाही लवकरच सुरू होणार आहे. या औद्योगिक वसाहतीमुळे तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या विकास होणार असून तालुक्यातील शेकडो बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.