पर्वरीत 641.46 कोटींच्या उड्डाणपुलास मंजुरी
पणजी : म्हापसा पणजी महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने सांगोल्डा ते पर्वरी दरम्यान सुमारे 5.15 किमीचा उड्डाण पूल (एलिव्हेटेड कॉरिडॉर) बांधण्यास मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहेत. या कॉरिडॉरच्या निर्मितीमुळे राज्यातील रस्ता वाहतुकीतील साधनसुविधा अत्याधुनिक होणार असून त्याचा फायदा स्थानिकांबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही होईल, व त्याद्वारे राज्यात पर्यटनाला अधिक वाव मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मंत्री गडकरी यांनी मंगळवारी त्यासंदर्भात दिल्लीत घोषणा करताना सांगोल्डा जंक्शन ते पर्वरीतील मॅजेस्टिक हॉटेल दरम्यान सुमारे 5.15 किमी लांबीचा सहा पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्यात येणार असल्याचे सागितले होते. या पुलामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यात मोठी मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. सांगोल्डा जंक्शन ते एनएच-66च्या मॅजेस्टिक हॉटेल दरम्यानचा हा 5.15 किमी लांबीच्या सहापदरी कॉरिडॉर विकसित करण्यावर सुमारे 641.46 कोटी ऊपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे खास करून म्हापसा-पणजी मार्गावरील वाहतूक सुरळीत होईल. वाहतूक कोंडीपासून लोकांना सुटका मिळेल. त्याचबरोबर मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योगाला चालना मिळेल, असे गडकरी म्हणाले. दरम्यान, 27 मीटर ऊंदीच्या या रस्त्यासाठी स्थलांतरीत कराव्या लागणाऱ्या स्थानिकांना निवासाच्या सोईसह सध्याच्या बाजारभावानुसार भरपाईही देण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.









