प्रतिनिधी/ बेळगाव
मुडा भूखंड प्रकरणावरून कर्नाटकात राजकीय घमासान सुरू असतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. सोमवार दि. 26 ऑगस्ट रोजी ते बेळगावला येणार असून जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाच दिवशी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णांच्या चार पुतळ्यांचे अनावरण होणार आहे.
सोमवारी सकाळी 10.30 वा. बेंगळूर येथील एचएएल विमानतळावरून विशेष विमानाने ते बेळगावला येणार आहेत. सकाळी 11.45 वा. सांबरा विमानतळावर त्यांचे आगमन होणार असून दुपारी 1.30 वा. कौजलगी, ता. गोकाक येथे उभारण्यात आलेल्या संगोळ्ळी रायण्णा पुतळा व किल्ल्याचे अनावरण करणार आहेत.
दुपारी कौजलगी येथील डॉ. सन्नक्की फार्म हाऊसमध्ये जेवण करून कळ्ळीगुद्दीला जाणार आहेत. 2.45 वा. संगोळ्ळी रायण्णा पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3.30 वा. मुडलगी तालुक्यातील यादवाड येथे उभारण्यात आलेल्या संगोळ्ळी रायण्णा पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सायंकाळी 4.30 वा. कल्लोळी, ता. मुडलगी येथे संगोळ्ळी रायण्णा पुतळ्याचे अनावरण करून सायंकाळी विशेष विमानाने ते बेंगळूरला जाणार आहेत.









