तृणमूलचे ट्रोजन डिमेलो यांचे आव्हान
पणजी : राज्यात प्रत्येक पातळीवर नियंत्रणाबाहेर गेलेल्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्याचे धाडस मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दाखवावे, तसेच दलालांवर नियंत्रण ठेवावे, असे आव्हान तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी दिले आहे. बुधवारी पणजीत पक्षकार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी पक्षप्रवक्ते जयेश शेटगावकर, युवा समन्वयक अँथनी पिक्सोटो यांचीही उपस्थिती होती. पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. राज्यात सध्या प्रत्येक पातळीवर माजलेला भ्रष्टाचार अगदी नियंत्रणाबाहेर गेला आहे. त्यात भर म्हणून दलालांचाही सुळसुळाट वाढला असून हे प्रकार कायमस्वऊपी थांबवावे, अशी मागणी डिमेलो यांनी केली.
31 ऑक्टोबर 2022 च्या आदेशात सूचिबद्ध करण्यात आलेली कार्ये आणि आरटीआय माहितीचा संदर्भ देत डिमेलो यांनी, दलालांकडून वसूल करण्यात आलेला दंड केवळ कळंगुट, पणजी आणि हणजुणे या केवळ तीन ठिकाणाचा होता, परंतु दक्षिण गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर चालणाऱ्या दलालांचे काय? तसेच हरमल, मांद्रे, मोरजी, मिरामार आणि दोनापावला हे किनारे दलालांपासून मुक्त आहेत काय? असे सवाल डिमेलो यांनी उपस्थित केले. यावरून हेच सिद्ध होते की हे सर्व दलाल स्वत: पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीच नियुक्त केलेले असून वैयक्तिक फायद्यासाठी ते त्यांचा वापर करून घेतात, त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात, असा दावा डिमेलो यांनी केला. दरम्यान, हे सर्व प्रकार थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून पर्यटन मंत्र्यांनी चालविलेली बेकायदेशीर कृत्ये थांबवावी, अशी मागणी डिमेलो यांनी केली.









