जळगाव / प्रतिनिधी :
राज्यातील सरकार सर्वसामान्यांच्या हिताचेच निर्णय घेत असून, याचा सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. मात्र, याने काहींना पोटदुखी सुरू झाल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, या वयात तरी काळी कामे करणे सोडा, असा टोला फडणवीस यांनी खडसे यांना लगावला.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, अब्दुल सत्तार आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राजस्व अभियान राज्यात राबवले गेले होते. मात्र, गेल्या अडीच वर्षात काय काय बंद केले, ते आता सांगत नाही. पण ‘शासन आपल्या दारी’ एकाच छताखाली राबवण्यासाठी लोक एकत्र येत आहेत. हे सामान्यांचे, कष्टकऱ्यांचे सरकार असून सर्वसामान्यांच्या हिताचेच निर्णय घेतले. याचा आज सकारात्मक परिणाम राज्यात होताना दिसत आहे. सामान्यांच्या जीवनात चांगले दिवस आले आहेत. याची काहींनी धास्ती घेतली आहे. केंद्राच्या सहकार्याचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींमुळे देशाचे नाव जगभरात घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जळगाव जिल्हयासाठी केळी विकास महामंडळ स्थापन केले असून त्यास १०० कोटी रूपयांची तरतूद करण्याचा निर्णय त्यांनी घोषित केला. तसेच विविध जल प्रकल्पांना गेल्या अडीच वर्षात सुधारित प्रशासकीय मान्यता दिली नव्हती. ती आपल्या शासनाने दिली, असे सांगत जळगाव धुळे नंदुरबार जिल्हयासाठी स्वतंत्र विभागीय आयुक्तालय करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
काहींना जळजळ : फडणवीस
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवले. यावर बोलताना फडणवीस यांनी टीका केली. अशी काळी कामे करणे सोडा, असा नाव न घेता सल्ला त्यांनी दिला.आम्ही बंद दारात राहून कामे करत नाही. याची काहींना जळजळ होती, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.








