कोल्हापूर : मराठा समाजाच्या प्रश्नाच्या पाठपुराव्याबाबत माहिती घेण्यासाठी आज संभाजीराजे छत्रपती मंत्रालयात गेले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांची भेट घेणे टाळले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ आहे, मात्र समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या छत्रपती संभाजीराजेंना भेटण्यास वेळ नाही, अशी नाराजी मराठा समाजाच्या समन्वयकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी आज छत्रपती संभाजीराजे मंत्रालयात गेले होते. प्रथम त्यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेऊन आढावा घेतला व त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे गेले. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा समाजाचे समन्वयक व समाजाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड ते दोन तास छत्रपती संभाजीराजे यांची भेट टाळली. या कालावधीत ते पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत राहिले पण समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या छत्रपती संभाजीराजे यांना वारंवार निरोप देऊनही ताटकळत राहावे लागले. या प्रकारानंतर छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
हे ही वाचा : पंतप्रधानांच्या दबावामुळे प्रकल्प गुजरातला गेला; पृथ्वीराज चव्हाण यांचा मोदींवर घणाघात