पोलीस अधिकाऱ्यावर उगारला हात : भाजपकडून निषेध
बेळगाव : मेळाव्यामध्ये गोंधळ घालणाऱ्या महिलांना पोलिसांनी सभामंडपाच्या बाहेर नेले. तरीदेखील गोंधळ सुरूच असल्याने मुख्यमंत्र्यांना संताप अनावर झाला. सभामंडपासमोर उभे असलेले यापूर्वीचे बेळगावचे मार्केट एसीपी व सध्याचे धारवाड येथील अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख नारायण बरमणी यांना व्यासपीठावर बोलावून घेतले. भाजप कार्यकर्त्या आंदोलन करत असताना पोलीस कुठे होते? असा प्रश्न विचारत त्यांच्यावर हात उगारला. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत गोंधळ घातल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या संतापले. या संतापाच्या भरात त्यांनी पोलिसांना लक्ष्य केले. इतकी मोठी यंत्रणा असतानाही भाजप कार्यकर्ते आत आलेच कसे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बेळगावमध्ये मेळाव्यासाठी आलेले धारवाडचे अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख नारायण बरमणी यांना व्यासपीठावर बोलावले. तुमचे एसपी कोण? असे विचारत त्यांनी हात उगारला. त्या ठिकाणी असलेल्या मंत्री एम. बी. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना तात्काळ आवरले. या घटनेमुळे सोमवारी दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात येत होता. समाजमाध्यमांवर याच व्हिडिओची सर्वत्र चर्चा होती. भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू होता.
सिद्धरामय्या यांचे वर्तन योग्य नाही-जगदीश शेट्टर
काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. यामुळे संयम गमावलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारला. ही कृती मुख्यमंत्री पदाच्या व्यक्तीने करणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी संयम बाळगणे गरजेचे होते. हा पोलीस यंत्रणेचा अवमान आहे. माजी मुख्यमंत्री जे. एच. पटेल यांच्याविरुद्ध नागरिकांनी अनेकवेळा निषेध करूनही ते लोकांशी शांतपणाने वागायचे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या या कृतीचे भाजपकडून निषेध करण्यात येत असल्याचे माजी मुख्यमंत्री व बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.









