गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंना आश्वासन
सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक टॅक्सी चालकांना गोवा राज्याच्या टॅक्सी बॅचसाठी लायसन्स मिळवायला मोठ्या अडचणी येत आहेत. त्याचबरोबर गोवा राज्यातील पोलीस आणि संबंधित प्रशासनही या चालकांवर दंड आकारते. या चालकांकडे महाराष्ट्र लायसन्स असले तरी त्यांना गोव्यातील टॅक्सी बॅच लावण्याची अडचण येते. त्यामुळे त्यांच्या कामात अडथळे निर्माण होतात आणि आर्थिक संकट ओढवते. याबाबत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे लक्ष वेधले. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमारेषेवरील टॅक्सी चालकांमध्ये एक प्रकारचा विश्वास आणि समाज असावा लागतो. दोन्ही राज्यातील प्रशासन यासाठी एकत्र येऊन समाधानकारक मार्ग काढण्याचे काम करेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टॅक्सी चालकांवरील अन्याय दूर केला जाईल आणि त्यांना योग्य न्याय मिळवून दिला जाईल. असे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिले. पणजी येथील हॉटेल ग्रँड हयात मध्ये झालेल्या एका खाजगी समारंभात मुख्यमंत्री सावंत आणि प्रवीण भोसले यांची भेट झाली. या भेटीदरम्यान भोसले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टॅक्सी चालकांसमोर असलेल्या गंभीर समस्यांचा मुद्दा मुख्यमंत्री सावंत यांच्या समोर ठेवला.









