प्रतिनिधी / बेळगाव
जम्मू-काश्मीरमध्ये अपघातात हुतात्मा झालेल्या जवानांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी श्रद्धांजली वाहिली. बेळगावातील सेना युद्ध स्मारकावर सुभेदार दयानंद तिरकण्णावर, महेश मारीगोंड यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींसमोर मुख्यमंत्री म्हणाले, की जवानांचे जीवन अत्यंत श्रेष्ठ आणि ध्येयाने प्रेरित असते. आमच्या राज्यातील जवानांचा अपघाती मृत्यू हा देशाला दिलेले बलिदानच असून त्यांच्या मृत्यूबद्दल मनाला मोठे दु:ख झालेले आहे. अपघातात मृत्यू झालेल्या चारही जवानांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मीही सहभागी आहे. सरकारमार्फत हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती मदत देण्यात येईल, असे सांगितले.
जम्मू-काश्मीर येथे सैनिकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात दयानंद तिरकण्णावर (बेळगाव), धनराज सुभाष (चिकोडी), महेश (बागलकोट) व अनुप (कुंदापूर) यांचा मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण राज्याला दु:खदायक आहे. चारही हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना सरकारमार्फत आर्थिक मदत देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, एच. सी. महादेवप्पा, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद आदी यावेळी उपस्थित होते.









