पुणे / वार्ताहर :
पुण्यात रविवारी रात्री कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने 24 वाहनांना उडवले. या अपघातात 13 जण जखमी झाले. अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली असून, त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
मणीराम छोटेलाल यादव (रा. मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. यादव याने वाहतूक नियमांची पायमल्ली करत कंटेनर चालवला. त्यामुळे तो अपघातास कारणीभूत ठरला. अपघाताबाबत पोलिसांना महिती न देता, त्याचप्रमाणे अपघातातील जखमींना वैद्यकीय मदत न करता अपघात स्थळावरून पळून गेला. म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास खेडशिवापुर बोगद्यातून भरधाव वेगाने हा कंटेनर आला. नवले पुलावर हा कंटेनर आला असता चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने रस्त्यावरील तब्बल 24 वाहनांना ठोकरले. यात 13 जण जखमी झाले तर अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अधिक वाचा : गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी गोडसेला बंदुक पुरवली
राहुल भाऊराव जाधव (रा.वारजे), शुभम विलास डांबळे, तुषार बाळासाहेब जाधव, आनंद गोपाळ चव्हाण (रा. सहयोग नगर, पुणे), राजेंद्र देवराम दाभाडे (रा. माणिकबाग पुणे), साहू जुनेल (रा. कोंढवा पुणे), ऑस्कर लोबो (रा. कोंढवा पुणे), मधुरा संतोष कारखानीस (वय 42, रा. वनाज), चित्रांक संतोष कारखानीस (वय 8), तनीषा संतोष कारखानीस (वय 16), विदुला राहुल उतेकर (वय 45.) अनघा अजित पभुले (वय 51, रा. वडगाव पुणे), अनिता अरुण चौधरी (वय 54, रा. राहटणी चौक) अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत.
दरम्यान, या अपघाताविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला, तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.









