दोन्ही राज्यांमध्ये भाजप आमदारांची बैठक : नेतृत्वाकडून नव्या चेहऱ्याला पसंती शक्य
वृत्तसंस्था/ भोपाळ, जयपूर
मध्यप्रदेशातील भाजपच्या आमदारांची बैठक आज भोपाळमध्ये पार पडणार आहे. या बैठकीत सर्व निवडून आलेल्या आमादारांसोबत भाजप पर्यवक्षेक हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, पक्षाच्या मागास वर्ग मोर्चाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण तसेच पक्षाच्या सचिव आशा लाकडा उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्याची निवड केली जाणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मध्यप्रदेशसोबत राजस्थानातही आजही राज्याचे नेतृत्व कोण करणार याचा निर्णय भाजपकडून जाहीर केला जाणार आहे. राजस्थानात वसुंधरा राजे यांच्या गटाकडून शक्तिप्रदर्शन होत असल्याने भाजप नेतृत्व कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मध्यप्रदेशातील भाजप आमदारांच्या बैठकीत पक्ष प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा उपस्थित असतील. या बैठकीसोबत मध्यप्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यासंबंधी उत्सुकता संपुष्टात येणार आहे. वर्तमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद पटेल, व्ही.डी. शर्मा, राकेश सिंह समवेत अनेक नेत्यांची नावे सध्या चर्चेत आहे. राज्यातील 230 पैकी 163 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ 66 जागांवर यश मिळू शकले आहे.
राजस्थानात राजे गटाचे शक्तिप्रदर्शन
राजस्थानात भाजपमधील वसुंधरा राजे गट शक्तिप्रदर्शन करत आहे. रविवारी सकाळी दिल्लीहून परतलेल्या वसुंधरा राजे यांनी अनेक भाजप आमदारांची भेट घेतली आहे. याचबरोबर माजी प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी, माजी आमदार प्रल्हाद पटेल, माजी मंत्री राजपाल सिंह शेखावत, देवीसिंह भाटी यांनी राजे यांच्याशी चर्चा केली आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेश कार्यालयातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. श्वानपथकाद्वारे परिसराची तपासणी करण्यात आली आहे. पक्षाकडून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांना पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
बैठक टळण्याचीही शक्यता
दुसरीकडे राजस्थानातील भाजप आमदारांची बैठक टळण्याचीही शक्यता आहे. सोमवारी आणि मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या लखनौ दौऱ्यावर असणार आहेत. अशा स्थितीत लखनौचे खासदार म्हणून राजनाथ सिंह यांची उपस्थिती राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात प्रस्तावित आहे.









