महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अनेक अडचणी, अडथळे, रुसवे-फुगवे, चक्रव्युह पार करत महायुतीला महायश मिळवून देणारे देवेंद्र गंगाधर फडणवीस यांची अपेक्षेप्रमाणे भाजप विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे. महायुतीचे नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार असे तिघे गुरुवारी आझाद मैदानावर एका रंगारंग सोहळ्यात शपथ घेतील. महाराष्ट्राचा लाडकाभाऊ देवेंद्र फडणवीस आहेत यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. या निवडीनंतर नागपूरसह राज्यभर भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. लाडू वाटले आणि फटाके फोडले. महायुतीला प्रचंड यश मिळूनही मुख्यमंत्री ठरवण्यासाठीचा गेला अकरा दिवसांचा सस्पेन्स अखेर बुधवारी या निवडीने संपला, ‘मी पुन्हा येईन होय मी पुन्हा येईन’ हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण करुन दाखवला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयभाई रुपाणी भाजपचे पक्ष निरीक्षक म्हणून मंगळवारी मुंबईत दाखल झाले होते. सकाळी या निरीक्षकांनी भाजपच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक घेतली आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव ठरवले गेले. पाठोपाठ भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक झाली आणि तेथे देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला व टाळ्यांच्या गजरात अनूमोदनासह तो स्विकारण्यात आला. या बैठकीला भाजपचा गट सहयोगी सदस्यासह 137 झाल्याचे आणि महायुतीचे संख्याबळ 240 झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला व त्यास पंकजा मुंडे, प्रविण दरेकर आणि अन्य नेत्यांनी अनूमोदन दिले. यावेळची निवडणूक आणि निकाल अभूतपूर्व असे वर्णन करत निर्मला सीतारामन यांनी नवे सरकार डबल इंजिनचे आहे ते जनतेच्या अपेक्षांना आणि जाहिरनाम्याच्या अंमलबजावणीसाठी कसोटीला उतरेल असे सांगितले. निवडीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक है तो सेफ है’ व ‘मोदी है तो मुमकीन है’ असे सांगत महाराष्ट्रातील आम जनतेचे आणि सहयोगी सदस्य व अजितदादा व एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. प्रचंड जनादेशाने भारावलेल्या फडणवीस यांनी आपण महाराष्ट्रातील जनतेला साष्टांग दंडवत घालतो असे भावविवश होत सांगितले. प्रचंड जनादेशाने जबाबदारी वाढली आहे असे स्पष्ट करत महाराष्ट्र सर्व आघाड्यांवर नंबर वनवर नेणार असे धोरणही त्यांनी जाहीर केले. शपथविधी पाठोपाठ मंत्रीमंडळ विस्तार आणि विधीमंडळाचे नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन, मंत्रीमंडळाचे खातेवाटप अशी पावले महायुतीच्या नेत्यांना उचलावी लागणार आहेत. मोठा जनादेश आणि सर्वांच्या मोठ्या अपेक्षा, महायुतीचे ऐक्य आणि धडाकेबाज काम यासर्व पातळीवर त्यांना काम करावे लागणार आहे. सन 2019 मध्ये भाजप सेनेला स्पष्ट जनादेश मिळाला होता पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनादेश बाजूला सारत शरद पवार आणि राहुल गांधी यांना सोबत घेऊन मुख्यमंत्रीपद पटकावले. गेली पाच वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला होता. रोज चिखलफेक सुरु होती. जातीधर्मात वाद लावले जात होते. देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले जात होते. वेगवेगळे संभ्रम निर्माण करत शरद पवारांनी ठाकरे आणि काँग्रेसला सोबत घेऊन रण माजवले होते पण मतदारांनी विशेष करुन लाडक्या बहिणींनी फडणवीस आणि महायुतीला समर्थन दिले आणि या सर्व राजकीय चिखलात कमळ उमलले. खरे तर इतके जबरदस्त यश मिळाल्यावर तातडीने हाच निर्णय अपेक्षित होता. पण एकनाथ शिंदे अडून बसले होते. बाहेरुन पाठिंबा, उपमुख्यमंत्रीपद नको, वगैरे आढेवेढे घेत ते गृहमंत्री व उपमुख्यमंत्री पदावर अडकले होते. अजितदादांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांना संधी मिळाली असे वाटत होते पण ते शक्य नाही हे लक्षात येताच अजित पवारांनी दहा मंत्रीपदे, केंद्रात प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद आणि एकाची राज्यपालपदी नियुक्ती व शिंदेंच्या बरोबरीने मंत्रीपदे मागितली होती. अजितदादांनी दिल्लीत तळ ठोकला होता. एकनाथ शिंदे गृह, गृहनिर्माण, नगरविकास यासह उपमुख्यमंत्रीपद मागत होते. शेवटी चर्चा, संकटमोचक महाजन यांच्या फेऱ्या होऊन तडजोड झाली व आता गुरुवारी अर्थात आज शपथविधी होणार आहे. भाजप महायुतीत तीन पक्ष असल्याने असे थोडे फार होणार हे अपेक्षित असले तरी नागपूरात संघाचे पदाधिकारी विलंबासाठी चिडलेले दिसले व संघाने डोळे वटारताच झटपट निर्णय झाले. भाजप गोटात विनोद तावडे, मुरलीधर मोहळ यांची मुख्यमंत्री पदासाठी नावे घेतली जात होती. महाराष्ट्राला मराठा जातीचा मुख्यमंत्री हवा अशी त्यामागे योजना होती. जनतेच्या मनात जात नसली तरी नेत्यांच्या मनात ती घट्ट रुतली आहे याचे त्यातून दर्शन झाले. पण शेवटी हुषार, कर्तबगार, कल्याणकारी, प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेला मराठी नेता मुख्यमंत्री पदासाठी नक्की करणे जनादेशामुळे भाग पडले आहे. आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री, नेते व सुमारे पंधरा हजार निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे व फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्यातील मंत्रीमंडळ व खातेवाटप हा विषय चर्चेने मिटला असे सांगण्यात येते आहे. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचार, गैरव्यवहार आरोप असणारा कोणी मंत्री नसेल अशीही भूमिका जाहीर झाली आहे. फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद पाच वर्षे लाभणार की काही काळ हे स्पष्ट झालेले नाही. गृहखाते फडणवीस स्वत: सांभाळणार असं दिसतं आहे. महाराष्ट्राला जनादेशाप्रमाणे भक्कम आणि स्थिर सरकार मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके भाऊ ठरले आहेत. भाजपने व मित्रपक्षांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. आता भव्य शपथविधी सोहळा आणि अपेक्षापूर्तीसाठी काम हीच अपेक्षा आहे. लगेचच मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. विरोधी पक्षाची विशेष करुन शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार राष्ट्रवादी गट पूर्णपणे जायबंदी झाला आहे. राज्याला विरोधी नेता होणार नाही असा सडकून पाडणारा जनादेश धडकी भरवणारा आहे तो पचवणे सोपे नाही. तुर्तास फडणवीस-3 सरकारला शुभेच्छा!
Previous Articleधुम्रवर्ण…
Next Article 132 वर्षांपूर्वीचे पत्र मिळाले बाटलीत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








