आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी आज मातोश्रीवर भेट देऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आपल्या भेटीत त्यांनी केंद्र सरकारने घेऊन येत असलेल्या नव्या आध्यादेशाविरोधाच्या लढाईमध्ये आपल्याला पाठींबा द्यावा असे आवाहन केले. तसेच देश हा लोकशाही आणि न्यायव्यवस्थेला न मानणाऱ्या लोकांकडून चालवला जात असून लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात असल्याचे म्हटले आहे. तसेच अहंकारी माणूस देश चालवू शकत नसल्याचेही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री केजरीवाल यांचे स्वागत करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांची लोकशाही वाचवण्यासाठी विरोधकांची एकजूट महत्वाची असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले “केजरीवाल जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा मातोश्रीवर येतात. मातोश्री ही नाते जपणारी वास्तू आहे. लोकशाही विरोधी लोकांचा विरोध करणे गरजेचे आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे. यावेळी ट्रेन चुकली तर लोकशाही गायब होईल.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिला आहे.
माध्यमांसमोर बोलताना अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे कि, “दिल्लीच्या लोकांनी आपल्या अधिकारांसाठी खुपच मोठी लढाई लढलेली आहे. 2015 ला जेव्हा आम आदमी पक्षाने सरकार बनवलं त्यावेळी मोदी सरकारने एक कायदा पारित करून आमची सर्व शक्ती काढून घेतली. आम्ही 8 वर्ष या विरोधात लढलो. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय आमच्या बाजूने दिला. पण आता केंद्र सरकार एक नवा आद्यादेश आणत आसून त्यामुळे लोकशाही आणि न्यायव्यवस्था भाजप कडून नाकारण्यात येणार आहे. त्यामुळे या आध्यादेशा विरोधात शिवसेनेने आपला पाठींबा द्यावा त्याचबरोबर इतर विरोधी पक्षांनी या विरोधात एकजुट करावी” असे त्यांनी आवाहन केले आहे.