एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील बंडखोरीदरम्यान माझी काय भुमिका होती हे फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच माहीत असून आमदार विनय कोरे यांना त्याची कल्पना नसल्याचा गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदिप नरके यांनी केला आहे. तसेच येत्या विधानसभेला महायुतीच्या उमेदवारीची माळ माझ्याच गळ्यात पडणार असून जनसुराज्यचे अध्यक्ष विनय कोरे हे महायुतीचे घटक असल्याने त्यांची मागणी गैर नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येतील तसे जिल्ह्यातील राजकिय वातावरण तापत आहे. काही दिवसापुर्वी महायुतीचे घटक असलेल्या जनसुराज्य पक्षाने करवीर विधानसभेच्या जागेवर दावा सांगितला होता. त्यामुळे शिंदे गटाचे समर्थक आणि माजी आमदार चंद्रदिप नरके यांची काय भुमिका असणार आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते.
आज माध्यमांशी बोलताना माजी आमदार चंद्रदिप नरके यांनी यावर भाष्य करताना महायुतीच्या उमेदवारीची माळ माझ्याच गळ्यात पडणार असून आमदार विनय कोरे हे महायुतीचे घटक असल्याने त्यांना मागणी करण्याचा हक्क आहे. असे म्हटले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी शिवसेना आणि भाजप युतीला जनसुराज्य पक्षाने पाठींबा दिला होता. त्यामुळे त्यावेळच्या राजकिय घडामोडीमागे जनसुराज्य शक्तीची मोठी ताकद महायुतीच्या मागे होती त्यामुळे जिल्ह्यातील करवीरसह पाच जागांवर दावा पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी सांगितला होता.
तसेच या राजकिय घडामोडीमध्ये करवीरचे माजी आमदार चंद्रदिप नरके यांची काय भुमिका होती असा सवालही त्यांनी केला होता. यावर प्रतक्रिया देताना चंद्रदिप नरके यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेनेच्या उठावा दरम्यान माझी भुमिका काय होती हे फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच माहीत आहे. त्यामुळे आमदार विनय कोरे यांना माझ्या भुमिकेची कल्पना नसल्याचं म्हटलं आहे.