एका बाजूने वाहतूक सुरू, नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अखेर अटल सेतू पुलाच्या एक बाजूने वाहतूक शनिवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहे. मेरशीवरून येणाऱ्या आणि म्हापसाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी अटल सेतूची एक बाजू सुरू करण्यात आली असून पुढील 5 दिवसांपर्यंत ती खुली राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी दिली. अटल सेतू पुलाचा फोंडा आणि पणजी भाग 2 एप्रिलपासून लोकांसाठी खुला केला जाईल, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी दुपारी अटल सेतूवरील सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तात्पुरत्या रहदारी योजनेनुसार पणजीत प्रवेश करणाऱ्या वाहनांना बहुस्तरीय कार पार्किंग इमारतीकडून डावीकडे वळावे लागेल, केटीसी सर्कलकडून पुढे जावे लागेल आणि पाटो किंवा पणजीमध्ये प्रवेश करावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अटल सेतू पुलाच्या रस्त्यासाठी मधला थर आणि त्यावर बिटुमेनचा वापर करण्यात आलेले तंत्रज्ञान फेल ठरले आहे. भारतातील अशा 2 यंत्रांपैकी एक जर्मन मेक मिलिंग यंत्राच्या मदतीने मधला थर सध्या काढला जात आहे, असे त्यांनी सांगितले. पूर्वीचा थर काढून त्याठिकाणी नवीन थर टाकणे हे तांत्रिक व किचकट काम असून त्यासाठी विलंब होत आहे, असे त्यांनी सांगितले. लोकांनी थोडा संयम बाळगावा, असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
आता काम मजबूत, टिकाऊ होईल!
मेमरी लेयर टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर बिटुमेन टाकण्याचे काम फक्त एक दिवसाचे असेल, असेही ते म्हणाले. कंत्राटदार कंपनीने वापरलेले तंत्रज्ञान अयशस्वी झाल्याने एल अँड टी हे काम आता स्वखर्चाने करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता वापरण्यात येणारे नवीन तंत्रज्ञानामुळे वाहतूक सुरळीत होईल व या कामाची मजबुती दीर्घकाळ टिकेल, असा दावा त्यांनी केला.
वाहतूक पोलिसांच्या मागणीला यश
अटल सेतू पूल बंद झाल्यामुळे राजधानी शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी ही कोंडी लवकरात लवकर सुटावी म्हणून अटल सेतूच्या एका बाजूने वाहतूक सुरू करावी, अशी मागणी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. तर दुसऱ्या बाजूने गोवा पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळाने (जीएसआयडीसी) उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र लिहून दुऊस्ती काम पूर्ण करण्यासाठी पुलाची बंदी 5 एप्रिलपर्यंत वाढवून देण्याची मागणी केली होती.
वाहन चालकांना मिळणार दिलासा राज्यात दहावीच्या परीक्षा 1 एप्रिलपासून सुरू होत असून त्या काळात वाहतुकीची कोंडी झाल्यास विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोचणे मुश्किल होईल. तसेच नियमित वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांनाही त्रास सहन करावा लागतो. मुख्य म्हणजे सोमवारपासून राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. पर्वरीचे विधानसभा संकुल याच वाहतूक कोंडीच्या मार्गावर असल्यामुळे मंत्री, आमदार व इतर महनीय व्यक्ती त्या कोंडीत अडकून पडण्याची शक्यता होती. अधिवेशन 31 मार्चपर्यंत म्हणजे आठवडाभर चालणार असून गुऊवारी 30 मार्च रोजी एक दिवस अधिवेशनाला सुट्टी आहे. त्यामुळे अटल सेतवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहिल्यास तर त्याचा फटका महनीय व्यक्तींना बसणार होता









