संगमेश्वर :
मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी म्हणून रत्नागिरी जिह्यात शेकडो प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत. त्यांचा सहा महिन्याचा कार्यकाल फेब्रुवारीअखेर संपत आहे. त्यामुळे या प्रशिक्षणार्थींचे पुढे काय? असा सवाल त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. अनेक तालुक्यातील या प्रशिक्षणार्थिंनी नोकरीत कायम करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. तर अनेकांनी पालकमंत्री उदय सामंत यांना भेटून याबाबत निवेदनही दिले आहे. त्यामुळे आता याबाबत शासन काय निर्णय घेणार याकडे जिह्यातील प्रशिक्षणार्थींचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कार्यान्वित होतानाच, सुशिक्षित बेरोजगार युवा–युवतींना रोजगाराची संधी मिळावी याकरिता शासनाने मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू केली. यामध्ये शिक्षणाप्रमाणे त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून काम दिले गेले. यात बारावी पदविकाधारक, पदवीधर, पदव्युत्तर, डीएड–बीएड अशी शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्यांना याचा चांगला लाभ उपलब्ध झाला. अनेकजण पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शाळांमध्येही गेल्या सहा महिन्यापासून प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत आहेत.
विविध कार्यालयात रिक्त असलेल्या पदांमुळे कार्यरत असलेल्यांवरचा भार हलका करण्याचे काम या प्रशिक्षणार्थींनी अल्प मानधनात केला आहे. तसेच प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्यांनी देखील आपल्या खांद्यावर शाळेचा भार घेत काम केल्याचे चित्र जिह्यातून दिसून येत आहे.
- पालकमंत्री सामंत यांना निवेदन
युवक – युवती आपला प्रशिक्षणार्थी कार्यकाल चांगल्या प्रकारे पूर्ण करत आहेत. प्रशासनालाही त्यांचा कामामुळे मोठा हातभार लागला. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात कार्यकाळ संपल्यानंतर आम्हाला पुढे देखील सामावून घ्या अशी आग्रही भूमिका त्यांनी आता घेतली असून पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे तसे साकडे घातले आहे. त्यामुळे त्यांच्या या न्याय मागणीचा विचार शासन आणि प्रशासनाने करावा अशी जोरदार मागणी रत्नागिरी जिह्याबरोबरच राज्यभरातूनही होत आहे.








