न्यायपालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचे वक्तव्य अंगलट
वृत्तसंस्था/ जयपूर
न्यायपालिकेसंबंधी केलेल्या वक्तव्याप्रकरणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अखेर माफी मागितली आहे. राजस्थान उच्च न्यायालयात मंगळवारी दाखल स्वत:च्या जबाबात गेहलोत यांनी जे काही बोललो होतो, ते माझे वैयक्तिक विचार नव्हते असा दावा केला आहे. माजी न्यायाधीशांनी अनेकदा न्यायपालिकेतील भ्रष्टाचारासंबंधी वक्तव्यं केली आहेत. माझे वक्तव्य मी त्यांचा उल्लेख करत केले होते. माझ्या वक्तव्यामुळे न्यायपालिकेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचली असल्यास मी माफी मागतो असे गेहलोत यांनी म्हटले आहे.
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए.जी. मसीह यांच्या खंडपीठाने मुख्यमंत्री गेहलोत यांचे म्हणणे नोंदवून घेत याप्रकरणी 7 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेहलोत यांच्या जबाबासह माजी न्यायाधीशांकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांचे दस्तऐवज सादर केल्याचे मुख्यमंत्र्याच्या वतीने बाजू मांडणारे वकील प्रतीक कासलीवाल यांनी म्हटले आहे.
न्यायपालिकेत भयंकर भ्रष्टाचार
मुख्यमंत्री गेहलोत यांनी 30 ऑगस्ट रोजी न्यायपालिकेत भयंकर भ्रष्टाचार होत असल्याचे म्हटले होते. अनेक वकील तर निर्णय लिहून घेऊन जातात अन् न्यायालयाकडून तोच निर्णय जाहीर होत असतो. न्यायपालिकेची स्थिती गंभीर असून देशवासीयांनी याबद्दल विचार करण्याची गरज असल्याचे गेहलोत यांनी म्हटले होते. गेहलोत यांच्या या वक्तव्यानंतर न्यायालयीन जगतात खळबळ उडाली होती. त्यांच्या विरोधात वकिलांनी निदर्शने केली होती. राजस्थान बार कौन्सिलचे माजी उपाध्यक्ष योगेंद्र सिंह तंवर यांनी यासंबंधी मुख्य न्यायाधीशांना तक्रारवजा पत्र लिहिले होते. तर अनेक वकिलांनी गेहलोत विरोधात याचिका दाखल केल्या होत्या. यातील एका याचिकेवर सुनावणी करत उच्च न्यायालयाने गेहलोत यांना नोटीस बजावली होती.









