रोजगारात स्थानिकांनाच प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश
प्रतिनिधी/ पणजी
वीज, पाणी यासारख्या अत्यावश्यक सेवांसह सरकारच्या सुविधा, सवलतींचा लाभ घेऊन एखादी कंपनी गोव्यात उद्योग सुरू करते तेव्हा गोमंतकीयांना त्याचा फायदा झाला पाहिजे. खास करून नोकऱ्यांच्या बाबतीत स्थानिकांनाच प्राधान्य देणे बंधनकारक असून या नोकऱ्यांसाठीच्या मुलाखतीही गोव्यातच घेतल्या पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्योगांना दिले आहेत.
गोव्यात प्रकल्प असलेल्या एमआरएफ कंपनीने प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी कुडाळ येथे मेळावा आयोजित केला होता. मात्र एका ईमेलमुळे त्यांची बनवेगिरी उघडकीस आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून हे निर्देश आले आहेत. गोव्यातील खासगी उद्योजकांनी नोकर भरतीसाठी गोमंतकीयांनाच प्राधान्य द्यावे. तसेच त्यासंबंधी मुलाखतीही गोव्यातच घ्याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
एका बाजूने राज्यात बेकारी वाढत आहे तर दुसऱ्या बाजूने येथे आस्थापने असलेल्या कंपन्या रोजगारात बिगरगोमंतकीयांना प्राधान्य देतात. त्यासंबंधीच्या मुलाखतींचे आयोजनही गोव्याबाहेरच करून स्थानिकांवर अन्याय करत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात गोव्यात प्रकल्प असलेल्या कंपन्यांनी नोकरीसाठी स्थानिकांनाच प्राधान्य द्यावे, असे यापूर्वीच बजावण्यात आले आहे. तरीही काही कंपन्या आडमार्गाने जाऊन मनमानी कारभार करत आहेत, हे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.









